Saturday, 12 November 2022

आठवणी गावाकडील

आपण कुठल्यातरी नातेवाईक किंवा शाळेतील मित्रांच्या ग्रुप वर असतो.कधी कोणाचा वाढदिवस असतो तर कधी कोणी तरी गेल्याची बातमी.खरे तर वाढदिवसाचे काही अप्रूप वाटतच नाही कारण प्रत्येकच बालपण वाढदिवस कधी साजरे न करण्यात गेलेले असते.

कधी तरी अचानक कोणी गेल्याची बातमी ग्रुप वर येते.क्षणात आपले मन गावच्या गल्ली बोळात पोहचते.गेलेल्या व्यक्तीच्या घरा पर्यंत जाते.खरे तर मधल्या वर्षात खूप काही बदलले असले तरी आपल्या मनात मात्र ते जुने घर असते.

जी व्यक्ती गेली तिच्या घराच्या ओट्यावर तर कधी घरा समोरील झाडा खाली आपण कित्येकदा त्या व्यक्तीला बघितलेले असते.त्यांनी पण आपल्याला बघितलेले असते.कोणाची मुले असली तरी आपलीच मुले समजून त्याना दिलेले सल्ले किंवा त्यांचे प्रेम आठवते.

अचानक जेव्हा ते या जगातून जातात तेव्हा त्यांची ती रिकामी जागा कुठे तरी आपल्या मनाचा कोपरा रिकामा करून जाते.आठवत राहतात त्यांच्या आठवणी त्यांचे असणे.त्यांचे वागणे त्यांचे बोलणे.
जगराहाटी म्हणून जग तर चालूच राहते.कोणा एकाची जागा रिकामी करून.जाणीव करून देत असते त्याचा स्टॉप आला आपला कधी येईल.आयुष्याची क्षणभंगुरता मनाला खिन्न करते.

कोण आपण कुठून आलो कुठे जाणार माहिती नाही.या शरीराचे सगळे नाते गोते,शरीर संपले नाते संपले.कोणत्या तरी अंनतच्या प्रवासात निघून जाणारे पुन्हा भेटले तरी ओळख मात्र विसरून गेलेले असणार.
असेच मनातले काही

आठवणीतील माणसे(बाळू टेलर)

आठवणीतील  माणसं.

आजकाल रेडिमेड कपडे घेण्याची फॅशन जास्त आली आहे.टेलर्सची शिलाई परवडत नाही म्हणून अनेक जण रेडिमेड कपडे घेणे पसंत करतात.

आमच्या लहानपणी मात्र कपडे शिवूनच घेतले जायचे.रेडिमेड कपड्यांना 'आयतळे 'कपडे हा शब्द प्रयोग वापरला जायचा.आजच्या सारखे ते पर्फेक्ट मापाचे मिळत नव्हते.आठवडा बाजारात जास्त करून कापड दुकाने असायचे.रेडिमेड कपड्याचे दुकान कमी असायचे.

आजचे कॉटन म्हणजे तेव्हाचे मांजरपाट किंवा खळीचे कपड म्हणायचे.पॉलिस्टर महाग असल्यामुळे सगळयांना परवडत नव्हते.श्रीमंत असतील तेच पॉलिस्टर कापड घेत.आज उलट झाले आहे.कॉटन महाग झाले."वक्त वक्त की बात"

कापड घेतल्यावर ती शिवून घेण्यासाठी तेव्हाच्या भाषेत शिंपी शोधणे किंवा टेलर शोधणे सुरू व्हायचे.खरे तर गावात भरपूर टेलर्स होते.काही परंपरागत काम करणारे तर काही हा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून करणारे.

असाच आमचा टेलर्स होता.बाळू नावाचा.
स्वभावाने अतिशय गरीब होता.राहायला तो मळ्यात राहायचा.गावाशेजारी त्यांचे शेत होते त्या शेतात त्यांचे घर होते.घरातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणून घरातील बरीच जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.

गावातील एका मातीच्या घरात त्याची मशीन होती.दिवसभर तो त्यावर काम करीत बसायचा.इतर वेळी त्या घरा समोरून जाताना तिकडे न बघणारे आम्ही मात्र नवीन कापड घेतली की त्याच्या दारात हजर व्हायचो.खरे तर फॅशन म्हणजे काय कसा बरोबर खातात हे माहिती नसणारे आम्ही.....गावात गणपती मध्ये एखादा  फुकट चित्रपट दाखवला की त्यातील नटी जसा ब्लाउज घालते (फुकट चित्रपट हे जास्त करून पौराणिक असायचे)म्हणून त्यात जास्त करून साडी नेसणारी नटी असायची.तिने घातलेल्या ब्लाउज सारखे अनेकजणी ब्लाउज शिवून घ्यायच्या.

आम्ही बाळू टेलर कडे जाऊन असेच वेगळे काही तर शिवून दे म्हणून मागे लागायचो.पंजाबी ड्रेसची फॅशन नव्हती.ज्याला आज गाऊन बोलतात तसे घेरदार मॅक्सी किंवा शर्ट आणि घेर असलेले लॉंग स्कर्ट(तेव्हा याला परकर पोलके म्हणत) शिवून घ्यायचो.

मंगळवारच्या बाजारात कापड घेतले की संध्याकाळी बाळू टेलरच्या दारात हजर व्हायचो.माप दिल्या पासून कधी देणार म्हणून सुरवात व्हायची.तो मोघम सांगायचा चार दिवसांनी या.चार दिवस कसातरी दम काढल्यावर पाचव्या दिवशी सकाळी त्याच्या दारात हजर व्हायचो.असे रोज म्हणून आठ दहा चक्कर मारल्यावर कुठे कपडे हातात मिळायचे.

बाळू एक माणूस आणि त्याच्या कडे खूप कपडे शिवायला येतात.एकाच मशीनवर काम करताना त्याला किती काम करावे लागते याची जाणीव नसल्यामुळे आम्ही कपडे उशिरा देतो म्हणून खूपदा बोललो आहे.तो मात्र नेहमी हसून देतो म्हणत राहायचा.

आज मुंबई सारख्या शहरात जेव्हा टेलर्स बघते तेव्हा बाळू आधी आठवतो.माप दिल्यावर असे शिवले तर तेवढे पैसे होतील बोलणारे.परवडत असेल तर शिवा ,हे बोलणारे.तेव्हा अनेकदा शिलाई न विचारता कपडे शिवल्यावर अनेक दिवस पैसे दिले नाही तर काही न बोलणारा बाळू आठवत राहतो.

अनेक वर्षे झाली बाळू सारखी अनेक माणसं भेटलीच नाही कधी तरी आठवणीतून ते बाहेर येत राहतात.कधी तरी ते आपल्या जगण्याचा एक भाग होते हे आठवत राहते.आज गाव बदलले मातीचे घरे गेली.गावचे साधेपणा त्या बरोबर हरवला.तरी गावात गेल्यावर मन कुठे तरी ओळखीच्या खुणा शोधत राहते.
असेच मनातले काही

आजची स्त्री आणि कुंकू


मी लहान असताना अनेकदा पाहिले ऐकले आहे.कोणी शुभ कामासाठी  निघाले आणि त्या वेळी एखादी विधवा स्त्री समोर आली.जर काम झाले नाही तर सरळ बोलत"अमुक पांढरा कपाळाची (अवदसा)समोर  आली.काम झाले नाही.
म्हणून अनेकदा विधवा स्त्रिया कधी समोर येत नसत.त्यांची जागा नेहमी घरात मागे असायची.

काळ बदलत गेला.स्त्रिया शिकल्या त्यांनी अनेक प्रथा धुडकावून लावल्या.आज स्त्रियांना शिक्षणामुळे समान अधिकार मिळाले.बुरसटलेल्या विचारातून त्या बाहेर आल्या.समाजाने बदल मान्य केले.मग ते स्वखुशीने असेल नाही तर नाईलाज म्हणून असेल  पण बदल झाले हे मात्र नक्की.

परंतु अलीकडे असे वाटते आपली वाटचाल पुन्हा मागे चालू झाली आहे समाज किती बदलला असे वाटत असले तरी काही टक्के असे आहेत त्यांना नवीन सुधारणा हव्या त्यांचा उपभोग घ्यायचा आहे आणि त्याच बरोबर स्त्रीने रूढी परंपरेत राहावे असे वाटत  आहे.अश्या वाटणाऱ्या लोका मध्ये बदल स्वीकारून आजचे स्वतंत्र उपभोगत असणारे समर्थन करतात तेव्हा हसावे की रडावे समजत नाही.

आज अनेक क्षेत्रात महिला पुढे आहेत.त्यांनी काय करावे काय नाही त्यांचा प्रश्न आहे.येथे समर्थन करणाऱ्या किती महिलांना त्यांच्या मुलीने जॉब वर असताना टिकली कुंकू लावून जावे वाटते.किंवा कोणी त्यांच्या कुंकू टिकली न लावणाऱ्या मुलींना असे बोलले तर चालणारे.

समाजाची एक गंमत असते कोणत्या गोष्टीचे समर्थन तो पर्यंतच जो पर्यंत सगळे उंबऱ्या बाहेर चालते.जेव्हा स्वतःवर किंवा स्वतःच्या परिवारा वर येते तेव्हा ते चूक असते.

प्रत्येकाला व्यक्त होण्याचा अधिकार आहे.व्यक्ती स्वतंत्र आहे.पण ते दुसऱ्याचे व्यक्ती स्वतंत्र हिरावून घेणारे नसावे.आणि अपमान करणारे नसावे.
असेच मनातले काही

गावाकडील आठवणी

कालच पौर्णिमा झाली.शहरात काय अमावस्या आणि पौर्णिमा...

माझे लग्नाआधीचे आयुष्य खेड्यात गेले.भरपूर मोठे अंगण होते.बहुतेक सगळे रात्री 9 पर्यंत झोपायचे.माझ्या घरा जवळून नाशिक शिर्डी रोड गेलेला होता म्हणजे आज ही आहे.रात्री 9 वाजता नाशिक सोलापूर गाडी आली की 9 वाजले समजायचे.कारण घरात घडयाळ नव्हते.

गावाच्या ज्या भागात मी राहायचे त्या भागात मी 10 वीला जाई पर्यंत लाईट नव्हत्या.गावातून गेलेल्या रस्त्यामुळे गाव दोन भागात विभागले गेले होते.एक बाजू म्हणजे गाव आणि दुसरी बाजू म्हणजे खळवाडी.

खळवाडी म्हणजे सगळे खळे....त्यातच घरं....घराच्या मागच्या बाजूला किंवा पुढच्या बाजूला शेतात आलेले पीक ठेवले जायचे.धान्य तयार करायला खळे असायचे.असे अनेक घरे मिळून खळवाडी.
म्हणून आमच्या बाजूला लाईट उशिरा आलेली.आज आठवते जेव्हा लाईटचे पोल नुसते आले तरी आम्ही आनंदाने नाचलो होतो.परंतु घरात लाईट मात्र घेतली नव्हती माझे लग्न झाले तरीही.

हे सगळे आठवले कारण खूप दिवसांनी मुंबईत काल पूर्ण चंद्र बघितला.जो चंद्र रोज बघायला मिळायचा त्याचे दर्शन मुंबईत मात्र दुर्लभ झाले आहे.चंद्राला चांदोबा,चांदो मामा म्हणायचो.तो लहान असताना खूप आवडायचा कारण पौर्णिमेच्या आधी चार पाच दिवस व नंतर चार पाच दिवस त्याचा लख्ख आणि शांत प्रकाश सगळी कडे पसरायचा.त्या प्रकाशात अंधार गायब होऊन जायचा.अंगणात खेळता यायचे.बसून गप्पा मारता यायच्या.शेजारच्या खळ्यात जाण्यास भीती वाटायची नाही.घरातील दिव्याच्या प्रकाशा पेक्षा बाहेर जास्त प्रकाश असायचा.

कोणा कडे टीव्ही नाही रेडिओ नाही.घड्याळ नाही.एकदा अंधार पडला की सगळे स्वतःच्या घरात गुडूप होऊन जायचे.9 ची गाडी आली म्हणजे खूप उशीर झाला असे वाटायचे.चंद्रप्रकशात आजूबाजूची झाडे,घरे स्पष्ट दिसायचे.सगळे कसे स्थितप्रज्ञ वाटायचे.एक वेगळी शांतता होती.जी कायमची हरवली आहे.

आज सगळी कडे नुसता प्रकाश आहे.रात्री दिवसाचा भास होतो.पण हरवला आहे तो चंद्र....तो प्रकाश 
विसरलो आहे पोर्णिमीची वाट बघणे.
कधी तरी आठवणी गावच्या गल्ली बोळात घेऊन जातात.इतकंच.
असेच मनातले काही

Thursday, 6 January 2022

बांगड्या भरणे(लग्नातील एक रीत)

"फुटकी काच यांची कधी माहिती नाही?" हे वाक्य अनेकांनी आपल्या आई आजीच्या तोडून नक्की ऐकले असेल.सून माहेरी गेली की बांगडया भरून आली पाहिजे अशीच काही रीत होती.दिवाळीत तर हमखास लेकी आणि बहिणी बांगडया भरूनच जात

जशी साडी हा स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तश्या बांगड्या हा देखील स्त्रीच्या आवडीचा विषय आहे.लग्नात मानपानाला फार महत्व असते.

जेव्हा घरात मुलाचे किंवा मुलींचे  लग्न असते.तेव्हा अनेक गोष्टी असतात त्यात बांगड्या भरणे हा एक सोहळा असतो(म्हणजे अलीकडे प्रमाण कमी झाले)खेड्यात अजून ही प्रथा आहे.

गावातील बांगड्या भरणारा कासार बोलावला जातो.मग तो आपल्या मोठया मोठया पिशवीतून बांगड्या घेऊन येतो.अनेक रंगांच्या ,अनेक डिझाईनच्या.सुंदर सुंदर बांगड्या.जावा,नंदा,मैत्रिणी शेजारी राहणाऱ्या महिला मग जमतात.जवळच्या त्या अगदी एक हातात दोन दोन डझन बांगडया घालून घेतात.मुद्दाम देखील घातल्या जातात.फुकट मिळतात म्हणून😂

काही फक्त मान म्हणून दोन दोन बांगड्या घालून घेतात.हा सोहळा जसा लग्न आधी होतो तसाच वधू माहेरी जाताना चुडा उतरवण्या वेळी होतो.नवरी आणि तिच्या करवल्या याना बांगड्या भरल्या जातात.

कधी काळी काचेच्या बांगड्या स्वस्त होत्या आता मात्र दीडशे पासून पाचशे पर्यंत डझन बांगड्या मिळतात.अलीकडे याचे बिल दहा हजराच्या पुढे जाते.म्हणून आता पूर्वी सारखा आग्रह केला जात नाही.अलीकडील मुली फार तर सहा बांगड्या पुढे बांगड्या घालत नाही.

पूर्वी जर बांगड्या साठी आग्रह केला नाही तर पुढील अनेक वर्ष  ऐकावे लागायचे."लग्नात लाख खर्च केला पण बांगडीची फुटकी काच नाही भरली"किती साधी माणसे आणि किती साधी अपेक्षा असायच्या ना??
अलीकडे लग्न म्हणजे इव्हेंट झाला.लग्न कमी आणि फोटो साठी केलेली प्रत्येक कृती जास्त वाटत असते.

आज आई कुठे काय करते या मालिकेत बांगड्या भरण्याचा एक सीन बघून आठवले.
असेच मनातले काही

मातेरे

मातेरे
 तू माझ्या आयुष्याचे मातेरे करून टाकले किंवा त्याने माझ्या आयुष्याचे पार मातेरे करून टाकले.हे वाक्य लहान असताना आजूबाजूच्या माणसा कडून खूपदा ऐकले आहे.खास करून महिला वर्गा कडून तर अनेकदा.

असे कोणी म्हटलं की मला लगेच आठवायचा तो मातेरा.काय असतो मातेरा.??शेतात जेव्हा कापणीला पीक यायचे तेव्हा ते कापताना काही कणसे खाली पडायचे.किंवा पाऊस आला पीक आडवे झाले तर हमखास त्याना माती लागायची.असे कणसे कुटल्यावर त्यात ती माती मिक्स व्हायची.धान्य कमी माती जास्त असे व्हायचे.

अनेकदा कापणी करताना मुळासह झाड उपटून यायचे त्याची माती मिक्स व्हायची.पूर्वी  कापणी करताना पडलेले कणसे देखील जमा करून आणायचे.एक धान्याचा कण वाया जाऊ द्यायचे नाही.म्हणून असे माती मिक्स झालेले धान्य त्याला मातेरा म्हणत.म्हणजे काय? चांगल्या धान्याची माती होणे.

शेतातील काम संपले की एखाद्या दिवशी नदीवर किंवा विहिरीवर हा मातेरा धुण्याचे काम चालायचे.माती मधील ते धान्य एका पातळ सुती कपड्यात जास्त करून फटके लुगडे यासाठी वापरले जायचे.त्या कपड्यात माती मधील धान्य टाकून दोन जणी ते झोळी दोन बाजूने पकडून पाण्यात बुडवायच्या पाण्यामुळे माती पाण्यात विरघळून जायची.असे खूपदा केले की माती पूर्ण निघून जायची आणि स्वच्छ धान्य खाली राहायचे.

मातेरा हा काही दर वर्षी निघत असे नाही.एखाद्या वर्षी जास्त असायचा मग तो धुण्याचा कार्यक्रम असायचा.आता कोणी  अश्या धान्य कडे बघणार नाही.जसे काही शब्द आता कालबाह्य झाले तसेच मातेरा कधीचा काल बाह्य झाला आहे.

जेव्हा कधी असे काही आठवते तेव्हा पूर्वीच्या महिला कशात स्वताला गुंतवून ठेवायच्या हे आठवते.चार दोन महिला एकत्र यायच्या मनापासून काम करायच्या एकत्र वेळ घालवायच्या.म्हणून त्यांच्या तोंडातून कधी बोर होते हे कधी बाहेर पडायचे नाही.

असेच आठवणीतील काही बाही.

हौद

हौद 
खरे तर शहरात आता बघायला न मिळणारा...
खेड्यात कालबाह्य होत जाणारा....हौद

शेतकरी आणि बैल एक अतूट नाते होते.जेव्हा शेती हाच व्यवसाय होता.अगदी जेव्हा विहिरीवर मोटा चालायच्या तेव्हा प्रत्येक विहिरीवर एक हौद असायचा.तेव्हा तो दगडाने बांधलेला आणि चुना घालून पक्का केलेला असायचा.मोट वर आल्यावर आधी त्यात उपडी व्हायची नंतर त्याच हौदातून दंड पाडून पाणी शेतीला पाठवले जायचे.

दिवसभर माणसांना आणि शेतात राबणाऱ्या बैला साठी त्या हौदात पाणी असायचे.काळ बदलला आणि विहिरीवर विजेवर चालणारी मोटर (पंप)बसवले जाऊ लागले.पंप चालू झाल्यावर दिवसभराचे पाणी काही तासात उपसले जाऊ लागले.विहिरीतून पाणी बाहेर टाकणारा पंप व्यवस्थित राहावा म्हणून आणि पाण्याचा वेग रोखला जावा म्हणून हौद बांधला जाऊ लागला. जो पूर्णतः विटा आणि सिमेंटचा पक्का बांधलेला असे.पंप बंद झाला तरी त्यात भरपूर पाणी राहायचे.

एकदा पंप चालू झाल्यावर विहिरी मधील स्वच्छ पाण्याने भरून तो वाहायला लागला की भारी वाटायचा.जर एखाद्याची विहीर गावा शेजारी असेल तर त्यावर सकाळी सकाळी बाई माणसांची गर्दी व्हायची कोणाला पाणी न्यायचे असायचे तर कोणाला धुनी धुवायची असायची.लहान मुलांना त्यात डुबायला आवडायचे.विहिरीतील त्या स्वच्छ आणि थंडगार पाण्याचा स्पर्श खूप वेगळाच असायचा.

त्या हौदाने रोज अशी माणसांची किलबिल ऐकलेली असायची.मुलांचा आरडाओरडा ऐकलेला असायचा.कोणा सासुरवाशीणचे हुंदके ऐकलेले असायचे.तिच्या डोळ्यातील पाणी स्वता मधून सामावून ते प्रवाहित केले असायचे.तहानेने व्याकुळ झालेल्या गाई बैलांची तहान भागवली असायची.त्यांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज ऐकलेला असायचा.कोणच्या तरी एकटेपणात त्याच्यात पाय सोडून बसलेल्या व्यक्तीच्या पायाला आपल्या स्पर्शने साथ दिलेली असायची.

भरलेला हौद त्यातून वाहणारे पाणी ...ते खाली दंडात पडताना होणारा त्याचा आवाज....उगाच त्यात हात घालून त्या पाण्याशी केलेला चाळा...आजूबाजूला डोलणारी पिके.सगळे कसे उल्हसित करणारे.

गाव सोडले शहरे जवळ केली.मनातून जात नाही ते गाव.
मग उगाच कुठे तरी मुलांना घेऊन रिसॉर्ट वर जायचे.क्लोरीन घातलेल्या आणि साठवून ठेवलेल्या त्या पाण्यात उड्या मारायच्या.मुला कडे बघून  खुश व्हायचे.मनाने मात्र आज स्वताचे अस्तित्व नसलेल्या त्या विहिरीवर त्या हौदा पाशी जाऊन यायचे.खिशात पाच पैसे नसताना केलेली ती मजा आठवायची.पुन्हा आपल्या कामाला लागायचे.

आजही शेतात तो हौदा आहे.पाणी नसलेली विहीर आहे.शेत करायला कोणी नाही म्हणून ओसाड पडून आहे.आता   ठिबकद्वारे पाणी शेताला दिले जाते.विहिरी ऐवजी बोरवेल घेतले जातात.

काळ बदलला आहे,बदलत आहे.कुठला तरी एखादा हौद गत काळाची आठवण मात्र देत असतो.
असेच मनातले काही.

असा सांता हरवलेलाच बरा,!

आज सोशल मीडिया वर एक पोस्ट अनेकदा समोर आली ती म्हणजे .
"आमचा हरवलेला सांता"
या मध्ये वासुदेवाला उद्देशून लिहिले आहे.जो आता दिसत नाही।कारण त्याची ओळख आम्ही आमच्या पिढीला करून दिली नाही.

मला तर आता वासुदेव दिसत नाहीत म्हणून उलट बरे वाटते.कारण सकाळी सकाळी वासुदेवाचे रूप घेऊन फिरणारा तो समाज आता काळानुसार बदलला आहे बदलत आहे.याचा आनंद वाटतो आहे.

खेड्यातील असल्यामुळे डोंबारी,नंदीबैल वाले,व्हरडी आईचे खोके डोक्यावर घेऊन जाणारे,स्वतःच्या अंगावर सोटा मारून घेणारे खुप जवळून बघितले आहे.आज या गावात मग त्या गावात फिरत राहायचे.ज्या गावात जाणार त्या गावातील मोकळी जागा बघून त्यावर आपली पाल ठोकायची.त्या गावात आणि आजूबाजूच्या गावा मध्ये फिरायचे.जे मिळणार ते घेऊन यायचे.

ती पण माणसेच आहे त्यांना पण इच्छा,अपेक्षा आहे याचा कोणी विचार करत नव्हते.स्वतंत्र मिळून त्याना आपल्या सविधान नुसार शिक्षणाचा अधिकार मिळाला.त्या समाजातील मुले आज शिकत आहेत कुठे तरी स्थिर होत आहेत.त्यांना जाणीव झाली आहे आपल्या हक्काची अधिकाराची.

वासुदेव आता हरवला म्हणणारे लोक येथे लिहिताना हे विसरतात की जेव्हा वासुदेव येतो तेव्हा त्याला आपल्या सोसायटी मध्ये घुसू न देणारा एक वर्ग आहे.

उलट आज ते दिसत नाहीत म्हणजे त्यांनी प्रगती केली हे नक्की.समजा नसेल केली तरी त्यांनी आपले जगण्याचे साधन नक्की बदलले आहे हे मात्र खरे आहे.किती दिवस तो वेष करून त्यांनी लोकांच्या दारा समोर उभे राहायचे.चार दोन रुपये किंवा पसा भर धान्य कोणी देईल याची वाट वघायची.

माझ्या लग्न आधी एक वासुदेव दुसऱ्या गावावरून यायचा.बाजार असायचा त्यादिवशी तो गावात यायचा.आमच्या घरी यायचा बरोबर आणलेली भाकर तुकडा सोडून खायचा.कधी स्वयंपाक झाला असेल तर आई त्याला जेवायला द्यायची.मग आपल्या पोतडी मधून तो सामान काढून वासुदेवचे कापडे घालायचा.काखेत झोळी अडकवून तो गाणे म्हणत चालायचा.त्याचे पायातील ते कडे छम छम वाजायचे.डोक्यावर मोराच्या पंखाची टोपी घालून कपाळावर टिळा लावून गाणे म्हणत म्हणत तो गोल गोल फिरायचा.लहान असल्यामुळे त्यात गंमत वाटायची.परत जाताना कधी कधी तो उदास दिसायचा पण तेव्हा ते समजायचे नाही.त्याला त्या दिवशी धान्य केव्हा पैसे कमी मिळायचे.

आई वडील शेतात राहायला गेले.माझे लग्न झाले आणि या सगळ्याचा विसर पडला.मागे चार पाच वर्षांपूर्वी अचानक एका ठिकाणी तो भेटला.लगेच ओळखले त्याने ,जवळ आला चौकशी केली.त्यांना विचारले अजून येता तुम्ही वासुदेव बनून.
त्यावर तो बोलला नाही ताईसाहेब आता मुले मोठी झाली शिकली कामाला लागली आता नाही मी फिरत.त्यांच्या साठी कष्ट घेतले ते कामाला आले अजून काय पाहिजे.

पसाभर धान्य आणि काही पैसा साठी फिरणारा त्याच्या घरातील तो शेवटचा होता बघून खूप बरे वाटले होते.असा सांता हरवलेला कधी चागले.राहिले नाताळ वेळी येणाऱ्या सांता बद्दल.ते एक काल्पनिक पात्र आहे.ते कोणा कडे  मागायला जात नाही.ते असेल ते दुसऱ्यांना देऊन आनंद वाटत असतो.त्याच्या बरोबर कधी वासुदेवाची तुलना होऊ शकत नाही.जे करतात त्याना अजून तो समाज आहे तसाच रहावा असे वाटते का?असा प्रश्न नक्की पडतो.
असेच मनातले काही.
फोटो गुगल सर्च