Thursday, 11 October 2018

अमिताभ बच्चनजी जियो हजारो साल

आज आमिताभ बच्चन यांचा वाढदिवस आहे. त्यांचा बघितलेला सगळ्यात पहिला चित्रपट आठवला ."गरम मसाला" असे त्या चित्रपटाचे नाव होते.

1980 किंवा 81 असे कुठले तरी वर्ष चालू होते .नक्की आठवत नाही .आमचे गाव छोटे होते. त्यामुळे गावात साधा टीव्ही कोणाकडे नव्हता.तर चित्रपट गृह असणे खूप दूरची गोष्ट होती.

 चित्रपट बघण्यासाठी गणपती येईपर्यंत वाट बघावी लागायची. कारण गणपती बसल्यानंतर गावातील दोन गणपती मंडळ होते.ते वेगवेगळी चित्रपट दाखवायचे .त्यात जास्त करून संत पुंडलिक संत तुकाराम अशा प्रकारचे धार्मिक चित्रपट असायचे. फार फार तर जयश्री गडकर सूर्यकांत यांचे चित्रपट दाखवले जायचे. हिंदी चित्रपट दाखवले जात नव्हते …त्यामुळे हिंदी चित्रपटा विषयी कधीतरी कुठेतरी भेटलेल्या मायापुरी मध्ये वाचायला मिळायचे.

गावामध्ये बदली होऊन आलेले बँकेतील लोक शाळेतील शिक्षक आणि पोलीस यांची मुले जेव्हा वर्गात नवीन यायचे .तेव्हा तेव्हा त्यांच्याकडून अनेक चित्रपटांच्या कथा ऐकायला मिळायच्या.  हेमा मालिनी असेल अमिताभ बच्चन असेल नाहीतर अजून कुठला हीरो त्यांच्या बद्दल ऐकायला मिळत असे.पण हेमा मालिनी येवढी फेमस होती त्याकाळच्या बायका जर एखाद्या मुलीने केसांची बट काढली तर तिला स्वतःला का हेमामालिनी समजते का आकडे पाडते. असे नक्की बोलायचे खरं तर हे पिक्चर मध्ये कशी दिसते हे ही माहिती नव्हते.रामायण टीव्ही वर आले आणि गावात व्हिडिओ वर चित्रपट दाखवणे सुरू झाले.पन्नास पैसे तिकीट असायचे पण आम्हाला कधी ते बघायला जायला परवानगी नव्हती.

गणपती बसायला अजून दोन महिन्यांचा अवकाश होता. तेच गावात बातमी आली अमिताभ बच्चनचा पिक्चर दाखवणार आहे. यावर्षी गणपती मध्ये मग काय सगळीकडे तीच चर्चा, मंगळवारी आमच्या गावचा बाजार असायचा .बाजाराच्या दिवशी आजूबाजूच्या खेड्यातील लोक बाजारासाठी यायचे .त्यांना देखील समजावे म्हणून जेव्हा कधी चित्रपट दाखवला जायचा. तेव्हा दिवसभर भोंग्यावरून पुकारले जायचे. ती सूचना भारी असायची…

" ऐका ऐका ऐका आणि लक्षात ठेवा . वावी आणि वावी पंचक्रोशीतील लोकांना कळविण्यात येते की अमिताभ बच्चन यांचा गरम मसाला हा पिक्चर ,अमुक तारखेला रात्री साडेनऊ वाजता वडाच्या झाडाखाली फुकट दाखवण्यात येणार आहे .(ही आमच्या गावात फुकट चित्रपट दाखवण्याची जागा होती.तर कधी एसटी स्टँड वर) अशाप्रकारे दिवसभर भोंग्यावरून ही सूचना दिली जायची. गावात असलेले दोन बोर्ड त्यावर देखील लिहून ठेवले जायचे बाहेरगावचे लोक ते पक्के लक्षात ठेवायचे.

 गरम मसाला हा चित्रपट दाखवण्याचा दिवस एकदाचा उगवला .रात्री साडेनऊ वाजता ही वेळ जरी पुकारलेले असली गावातील अनेकांकडे त्यावेळी घड्याळ्याच नव्हते .अंधार पडल्यानंतर एक तासानंतर म्हणजे साधारण साडेसात आठ च्या दरम्यान पूर्णा मैदान भरले. समोर पडदा लावलेला होता कधी पिक्चर सुरू होतो याची लोक वाट बघत होते .कारण सगळे पहिल्यांदीच अमिताभ बच्चन ला पडद्यावर बघणार होते. एकदाचा पिक्चर सुरू झाला पिक्चर सुरू अर्धा-पाऊण तास झाला असेल, पडद्यावर जीवन अरुणा इराणी ला सांगत होता "नाचो" त्यावेळी अरुणा इराणी मै नही नाचूंगी असे म्हणते आणि त्याच वेळी धो धो पाऊस सुरु झाला .लोकं पिक्चर बघण्यात एकदम गुंग झाले होते. आणि अचानक आलेल्या पावसामुळे सगळे  गायब झाले. कारण पडदा भिजला होता काही वेळाने पाऊस थांबला काही लोक परत जमा झाले. पण पडदा भिजल्यामुळे पुढचा पिक्चर दाखवला गेला नाही .दुसऱ्या दिवशी सगळ्यांच्या तोंडी अमिताभ बच्चन ची चर्चा होती. त्याचबरोबर "गरम मसाला पावसाने गार करून टाकला म्हणून हसत होते"

 पुन्हा आठ दिवसांनी तो चित्रपट दाखवला जाणार म्हणून त्याची वेळ आणि तारीख पुकारली गेली… पुन्हा तेवढ्या संख्येने लोक हजर झाले . जिथपर्यंत पिक्चर बघितला होता .त्याच्या थोडा पुढे गेल्यानंतर अचानक लाईट गेली. आत्ता लाईट येईल मग लाईट येईल .म्हणून लोक बसून राहिले. पण एक तास झाला तरी लाईट आली नाही .मग कंटाळून लोक घरी निघून गेले. अशा प्रकारे दोनदा चित्रपट पूर्ण झालाच नाही. त्यानंतर काही दिवसांनी पुन्हा हा चित्रपट दाखवला गेला.  अशा प्रकारे एकदाचा अमिताभ बच्चन यांचा तो चित्रपट लोकांनी बघितला. मध्ये काही वर्षे गेली. जुन्या गणपती मंडळातील सदस्यांची जागा तरुण मित्र मंडळ आणि घेतली .आणि त्याचबरोबर अमिताभ बच्चनचा दिवार, जंजीर आणि अनेक चित्रपट गावातील मोकळ्या जागेत जमिनीवर बसून बघितले .त्या काळामध्ये चित्रपट बघण्याचे ते एकमेव साधन होते. आणि त्यातही एक वेगळी मजा होती. त्यावेळी हे देखील माहीत नव्हते अजून तीस-पस्तीस वर्षाने सुद्दा आपण या  माणसाला पुन्हा काम करताना बघणार आहे.ते लगेच चित्रपट रिलीज झाल्या बरोबर.
वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा.बच्चनजी💐💐💐

Saturday, 4 August 2018

मैत्री आयुष्यातील एक सुखद नाते......
चांगले मित्र मिळण्यास मात्र नशीब लागते.कारण मित्र आयुष्याला वेगळे वळण देण्यास कारणीभूत ठरतात.मग ते वळण चांगले असते नाही तर वाईट.

बालपणात जास्त करून खेळायला साथ देतात ते मित्र होतात.त्यांच्या कडून फायदा ना तोटा असतो.खरे मित्र तारुण्यात प्रवेश करताना कसे मिळतात यावर बरेच काही ठरते.मुलगा असो की मुलगी वयात येताना शरीरात काही बदल होतात.मोठे होतो आहे याची जाणीव होते.त्याबद्दल बोलायला जवळचे वाटतात ते मित्र.

खरे तर याच वयात चांगले मित्र मिळणे गरजेचे असते.कारण आईवडील बरोबर जर संवाद चांगला नसेल तर अनेकदा आईवडील मुलांना काय चांगले हे सांगण्यास कमी पडतात.आपले मुले वाईट संगतीत जाऊ असे वाटत असते.त्यांनी काही चूक केली तर संजणून सांगण्या ऐवजी ते रागावतात.मग आता आपण मोठे झालो तरी आईवडील रागावतात याचा मुलांना राग येतो असा वेळी ते जास्त रमतात ते मित्रा बरोबर.

पण मित्र हे खरे असेल तर नेहमी चूक केल्यावर कानउघाडणी करतात.पण जर मित्र चांगले नसतील तर ते त्यांच्या बरोबर वाईट संगती मध्ये घेऊन जातात.हे दोन्ही मित्र कसे ते दिसते आणि समजते देखील.पण या व्यतिरिक्त अजून एक मैत्री करणारे असतात जे अतिशय घातक असतात.

काही मित्र हे वरील दोन्ही प्रकारात मोडत नाही.ते आपल्या खूप जवळचे असतात असे दाखवत असतात.पण आतून तुमचे नेहमी वाईट चिंतीत असतात.वरवर तारीफ करणारे हे मित्र मात्र वेळ आली की चार चौघात हसून तुमचा अपमान करत असतात.तुमच्या एखादया कमजोरीचा पुन्हा पुन्हा उल्लेख करत राहतात.चुकून जर ते तुमच्या पेक्षा  वरच्या सर्कल मध्ये वावरत असतील तर ते कसे वेगळे याची पुन्हा पुन्हा जाणीव करून देत राहतात.

काहींना तर भांडायला मित्र हवा असतो.त्यांचे प्रॉब्लेम सोडायला मित्र हवा असतो.पण फक्त भाषा चांगली नाही म्हणून चांगल्या ठिकाणी नेण्यास टळतात.तसे बाकी मित्रा कडे बोलून मजाक उडवतात.असे मित्र मात्र सगळ्यात घातक असतात.


Friday, 3 August 2018

प्रत्येकाची आनंद खुशी साजरी करण्याची पद्धत किती वेगवेगळी असते ना?
एखादी गोष्ट मिळाली की एखादी व्यक्ती अगदी जागेवरच उड्या मारते नाही तर आनंदाने नाचत सुटते.

काही व्यक्ती जोरात " एस" म्हणून दोन्ही हात समोर करून मुठी बंद करून स्वतःच्या हृदया जवळ घेऊन खुश होतात.

काही जर घरात असतील तर आनंदाची बातमी मोबाईल वर भेटली की सर्वात आधी अगदी आईबाबा समोर असले तरी जोरात त्यांच्या नावाने किंचाळतात.आईला गोलगोल फिरवत स्वता गिरकी घेतात.बाबांना आनंदाने मिठी मारतात.असा लोकांना स्वताचा आनंद नेहमी स्वता पेक्षा दुसऱ्या बरोबर शेअर करायला आवडतो.

काही मात्र मित्रा बरोबर पार्टी करतात.काही लोक मात्र अतिशय धार्मिक असतात.ते आनंदाची बातमी भेटल्या बरोबर कुठल्या तरी मंदिरात जातात.जे झाले ती देवाची कृपा असे त्यांना वाटते.

पण काही लोक खूप शांत अबोल असतात.त्यांना झालेला आनंद आणि दुःखे दोन्ही सांगता येत नाही.अति आनंदाने फक्त त्यांचा चेहरा उजळून निघतो.

काही लोका जवळ स्वतःची प्रेमाची माणसे नसतात.एक तर त्यांना त्यांनी आयुष्यात गमावलेले असते.मग अशी माणसे कुठे तरी नदी किनारी किंवा एखादया समुद्र किनारी जाऊन एकटेच बसतात.असे एकटे बसणे हा त्याचा आनंदा साजरा करण्याची पद्धत असते.

काही शॉपिंग वेडे मात्र वेड्या सारखी शॉपिंग करत सुटतात.
शेवटी काय.............

खुशी अपनी अपनी........

Wednesday, 27 June 2018

प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेले सण

प्रेम व्यक्त करण्यासाठी असलेले सण उत्सव .

आता स्त्री असो की पुरुष किती सहज प्रेम व्यक्त केले जाते.I Love You म्हटलं की झाले.किंवा अजून मिठी मारणे किस घेणे.बरे या साठी आता कुठे आहे याला जास्त महत्व राहिले नाही.म्हणजे काय स्त्री सहज आपले नवऱ्या वरील प्रियकरा वरील प्रेम व्यक्त करते.

पण अनेक वर्षे मागे जा.जेव्हा एकत्र कुटुंब पद्धती होती.घरात दोन तीन सासवा,आज्जी सासू,नणंद जावा सगळे असायचे तेव्हा डोक्यावर पदर घेऊन वावरणारी स्त्री होती.स्वयपाक घर  हेच तिचे अस्तित्व होते.बैठकीच्या खोलीत तिला जास्त प्रवेश नव्हता.मोठ्या माणसा समोर तिला आपल्या पती बरोबर बोलायला परवानगी नव्हती.तसे बोलणे मार्यदेत बसत नव्हते.

त्यावेळी तिचा दिवस मोठ्या पहाटे सुरू होत असे.जात्यावर दळण दळण्यापासून ते रात्री सर्व झोपल्या नंतर पूर्ण वेळ ती कामात असे.असा वेळी दिवसभरात कधी तरी तिला पती बरोबर बोलायाला मिळत असे नाही तर नाही.लहान वयात होणारी लग्न कुटुंब नियोजनाची कोणती पद्दत नसल्या मुळे दर वर्षी येणारे आईपण आणि त्यामध्येच जाणारा वेळ यामुळे आपल्या पती साठी देता न येणारा    वेळ यातून पती बरोबर तिला घालवायला रात्रीचे काही तासच वेळ मिळत असायचे.

नवरा आपल्या बायकोचे कौतुक करण्यासाठी कधी तरी एखादे नवीन लुगडे घेऊन येत असे किंवा एखादा दागिना यातून तो सगळ्या समोर आपल्या बायको वरील प्रेम व्यक्त करत असे.आपण दिलेल्या वस्तू घालून जेव्हा बायको समोरून गेल्यावर त्याच्या नजरेतील प्रेम तिला दिसत असे.पण स्त्री असे काही करू शकत नव्हती.एकत्र कुटुंब म्हणून सगळ्यांना जे केले तेच तिला आपल्या नवऱ्याला वाढायला लागे.

मग सगळ्या समोर आपल्या पती बद्दल प्रेम व्यक्त करायला म्हणून काही सन असावे.जसा दिवाळी पाडवा ,संक्रात,हरितालिका,आणी वटपौर्णिमा असावे.

मला तुमची किती काळजी आहे.किती प्रेम आहे हे दाखवण्यासाठी वटपौर्णिमा हा सण असावा.अगदी बिनधास्त पणे पूजेची तयारी करायची छान पतीने दिलेले लुगडे चार दागिने घालायचे बाकी सख्या बरोबर सामूहिक पूजा करायची.गाणी म्हणायचे ज्यात आपल्या नवऱ्याचे गुणगाण गायचे.सगळ्या समोर नवर्याच्या नाव उखण्यातून घ्यायचे.त्याच्या पाया पडून त्याच्या बद्दल प्रेम व्यक्त करण्याचा दिवस.

खरच किती छान होती कल्पना ना पती बद्दल सगळ्या समोर प्रेम व्यक्त करण्याची.आपली पत्नी फक्त आपल्या साठी तयार झाली .आपल्या साठी तिनी उपवास केला या भावनेने त्याला किती आनंद होत असेल ना? हा सगळा विचार करून वाटते खरच किती छान कल्पना होत्या ना या सगळ्या मागे.

Friday, 16 March 2018

कधी तरी असे पण जगायचे

जगता जगता लक्षात आले,खूप काही जगायचे राहून गेले.किती जगलो हे तर सांगता येते.पण किती जगणार हे कुठे माहिती?

कधी तरी निवांत क्षणी जाणीव झाली थोडे तरी स्वता साठी जगावे.मी कशी हे स्वतःलाच विचारून बघावे.मला काय येते.जे मी विसरले ते पुन्हा करून बघावे.स्वताच स्वतःचे कौतुक करून बघावे.

अनेक गोष्टी आवडत नसतात तरी कधी गरज तर कधी नाईलाज म्हणून ते करत असताना जीवाची घुसमट होते.कधी जीव गुदमरतो.असा ठिकाण पासून दूर जावं,आवडेल तिथे फिरावे.हसावे वाटले तर हसावे अगदी खळखळून,मनापासून हसून घ्यावे.कोणाला काय वाटेल याचा विचार न करता राग आला तर खुशाल रागावून घ्यावे.वाईट वाटले तर खुशाल रडून घ्यावे.कशाला रडतेस म्हणून स्वतःचे सांत्वन  स्वताच करावे.

एखादा ड्रेस आवडला तर बिनधास्त घालावा.कसा दिसतो कोणालाच नाही विचारायचे.छान तयार होऊन आरशात बघत स्वतःलाच विचारायचे"सांग दर्पण, मी कशी दिसते"?
जगात सगळ्यात सुंदर मीच आहे असे म्हणून स्वताशी लाजत सुंदर गिरकी घ्यायची.

कधी तरी काय रोज रोज तेच करायचे म्हणून सगळी कामे तशीच टाकून द्यायची आणि आणि लोळत पडायचे.मला बदल हवा असे स्वतःलाच सांगायचे.छान बाहेर भटकायचे.किती वय झाले कोणी काकू कोणी आंटी काही म्हणू आपण मात्र स्वताला तरुणच समजायचे.मनापासून स्वतःच्या मनाला जपायचे.

कधी तरी असे पण जगायचे।
कधी तरी असे पण जगायचे।.कधी तरी असे पण जगायचे

Thursday, 22 February 2018

चणा भाजी(हरभरे भाजी)
साहित्य-100 ग्रॅम भिजवलेले हरभरे.
मिडीयम 1 कांदा.1 टोमॅटो.
1 टे.स्पून गरम मसाला.
1 चमचा लाल तिखट.(ऐच्छिक)
 प्रमाणात मीठ.
कृती.
प्रथम कढईत तेल टाकून घ्यावे.त्यात जिरे,लसूण कढी पत्ता ,कोथंबीर टाकून फोडणी करून घ्यावी.नंतर त्यात कांदा टाकून गुलाबी परतून घ्यावा त्यात चिरलेला टोमॅटो टाकावा.त्यात कांदा खोबरे वाटण