Saturday, 21 August 2021

व्यक्ती समुह प्रिय असतात.

व्यक्ती ही समूह प्रिय असते.त्याला आवडते समूहात राहणे म्हणून तो नेहमी साथ शोधत असतो. त्यातच खुश राहण्याचा प्रयत्न करतो. आयुष्य चालू राहते. माणसे भेटत जातात नंतर लक्षात येते भेटलेली सगळी माणसे आपली नसतात. काही आपलेपणा दाखवतात काही दिवसांसाठी तर काही केलेल्या उपकाराची परतफेड म्हणून मैत्री करतात .पण तो त्यांचा खरा चेहरा नसतो. मग एक दिवस त्यांचा खरा चेहरा  समोर येतो आणि मग आपल्याला प्रचंड दुःख होते कोणीतरी आपला वापर करून घेतला हे समजते पण तोपर्यंत वेळ निघून गेलेली असते.
 आणि पश्चातापाशिवाय आपल्याजवळ काही उरत नाही.

 आयुष्य असेच चालू राहते. आयुष्याच्या वाटेवर असेच लोक भेटत जातात.अनुभवाचे धडे शिकवून जातात तरीही समूहामध्ये राहण्याच्या सवयीमुळे आपण पुन्हा पुन्हा मैत्री करत राहतो. नवीन कळपात   दाखल होत राहतो मग वाटते खरच आपल्याला कुणाची गरज असते का ?? का जगू शकत नाही आपण एकटे ??आपण एकटेपणाला घाबरतो का त्याचे उत्तर होय !आपण एकटेपणाला घाबरतो .म्हणून आपण पुन्हा पुन्हा माणसांमध्ये  सामील होतो.

 मागे वळून बघताना जाणीव होते. का वागलो आपण असे ? याचे उत्तर आपल्याकडेही नसते .आपण मात्र चालत राहतो. आयुष्यही चालू राहते अनेक अनुभवायचे गाठोडे तयार होत राहते.
असेच मनातले काही

Thursday, 19 August 2021

ज्योतिष मार्गदर्शन

#मानसिक_क्रयशक्ती
(Psychological purchase power)
@सचिन मधुकर परांजपे 

सकारात्मक विचारसरणीचा पाया (Base) हा आनंदमय आणि शुभ हवा असं मला वाटतं. सकारात्मक विचारसरणीचा या लेखातला संदर्भ हा आपण आत्ता श्रीमंती पुरता घेऊया. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात #श्रीमंती आणि #ऐश्वर्यसंपन्नत्ता या गोष्टीला कमीअधिक प्रमाणात महत्त्व आहेच (जी माणसं पैसा, श्रीमंती याला महत्व देत नाहीत अशांनी हा लेख वाचण्यात वेळ फुकट घालवू नये) माझ्या मते भरपूर पैसा हा तुमच्या आयुष्यातील ९९% समस्या चुटकीसरशी संपवू शकतो. १% तुमचं नशिब...

पैसा भरपूर शिल्लक असणे म्हणजे व्यक्ती श्रीमंत आहे असं मी मानत नाही. असलेल्या पैशाला क्रयशक्तीची बाजू मजबूत असणं अत्यंत गरजेचे आहे. क्रयशक्ती म्हणजे purchasing power. पैसा खर्च करुन सुखाची साधने, सेवा, गरजा, जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्याची क्षमता. पैसा असला म्हणजे क्रयशक्ती असतेच असं नाही आणि पैसा अजिबात नसेल तरी क्रयशक्तीचा अभाव अर्थात असतो. गाठीशी पैसा नसताना क्रयशक्तीचा वापर केला तर मनुष्य कर्जबाजारी होतो (क्रेडिट कार्ड लोन्स ओव्हड्यू होणे वगैरे) पैसा असताना क्रयशक्ती नसणे हे कंजुसपणा किंवा कर्मदरिद्रीपणाचे लक्षण आहे. Believe me, प्रत्येक कंजुस आणि कवडीचुंबक माणसाचा मुलगा किंवा नातू उधळ्या असतो. तो साठवलेल्या पैशाचा सत्यानाश करतो. या लेखात आपण क्रयशक्तीचा समन्वय पहाणार आहोत.. तो मानसिक पातळीवर...

Thought is a matter असं गौतम बुद्ध म्हणतात. विचार ही एक वस्तू आहे. विचार घटना घडवून आणतात (किंवा बिघडवतात) मला मर्सिडीज बेन्झ एस क्लास किंवा रोल्स रॉईस फॅन्टम घ्यायची आहे. मला स्वित्झर्लंडला स्वतःच्या मालकीची आलिशान विला हवी आहे इथपासून मला फाईव्ह स्टार हॉटेलमधे डिनर करायचे आहे किंवा मला केल्विन क्लेन्सची डेनिम हवी आहे... या प्रत्येक इच्छा या काही कोटी रुपयांपासून ते हजारो रुपयांपर्यंतच्या मुल्याच्या आहेत. या वस्तू हव्या असतील तर मला विविक्षित रक्कम खर्च करावी लागेल. ती रक्कम माझ्याकडे नसेल तर मला वस्तू मिळणार नाहीत इतकं सोपं गणित आहे. इथे आपण रोज एक छोटीशी Exercise करायची आहे....

आपल्या ज्या इच्छा अपूर्ण आहेत, ज्या गोष्टी/वस्तू/सेवा/साधने खरेदी करायची मनापासून तीव्र इच्छा आहे त्या कमाल पाच गोष्टी (maximum 5) मनात त्यांच्या अंदाजे मुल्यासकट तयार करायच्या. सुरुवातीला त्या गोष्टी अप्राप्य पण तरीही शक्यतेच्या टप्प्यातल्या निवडायच्या (उदा. आयफोन 11 Pro मॅक्स किंमत अंदाजे 1,24000) अशाच “तत्सम  पाच वस्तू खरेदी करण्याची माझी इच्छा आहे आणि मजजवळ तेवढे पैसे आहेत” हे वाक्य तयार करुन ते एका कागदावर लिहून तो कागद कायम स्वतःपाशी बाळगावा. म्हणजे पाच वस्तूंची नावे, समोर अंदाजे किंमत आणि खाली एकूण किंमत व वर दिलेलं वाक्य... पेनाच्या शाईचा रंग, कागदाचा रंग, टाईप या गोष्टी दुय्यम आहेत. त्या कागदालाही कसलं बंधन, सोयरसुतक, मासिक पाळी वगैरे बंधने नाहीत. (तुमच्या मनात येईल ते कोणतंही बंधन नाही) तो कागद फक्त जवळ वॉलेटमधे बाळगायचा आणि दिवसातून दहा वेळा तरी वाचायचा. शक्यतो कोणालाही दाखवू नका. कागदाच्या अगदी तळाशी ज्यांच्याकडून तुम्हाला ही पोस्ट मिळाली ती व्यक्ती, मी आणि बाबाजींचे लेखी आभार मानावे (हे गुढ रहस्य आज देत आहे म्हणून) फक्त आभारप्रदर्शन लेखी करायचे (औपचारिक) 

पाच वस्तूंच्या खरेदीची जी जी इच्छा पूर्ण होत जाईल त्या त्या वस्तू आणि किमतीवर काट मारायची. पाचही वस्तू खरेदी झाल्यावर तो कागद विसर्जन करायला हवा. लक्षात ठेवा हे काम फक्त मटेरियलिस्टीक, भौतिक वस्तूंच्या खरेदीसाठीच आहे (बाकी इच्छा नाही). In short, ज्या गोष्टी अप्राप्य आहेत त्या आपण नक्की खरेदी करु शकतो, तेवढे पैसे आपण लिलया खर्च करु शकतो हे तुमच्या आंतर्मनावर सातत्याने बिंबायला हवंय. आणि कालांतराने काही रक्कम उभी रहायला सुरुवात होते जी संबंधित वस्तूच्या खरेदीसाठीच आहे हेही समजून येते. याशिवाय काही शंका असल्यास विचारणे. सवडीने उत्तर देतो.

-सचिन मधुकर परांजपे (पालघर)

#बाबाजी_महाराजांचे धन्यवाद आणि हजारो वाचकांस निरोप्या म्हणून माझी निवड करण्यात आली त्याबद्दल आभार

Monday, 9 August 2021

आठवणीतील सण

हिंदू धर्मात श्रावण महिन्यास अतिशय महत्व आहे.कारण श्रावणात अनेक सण असतात.दिव्याच्या अमावस्या पासून सुरू होऊन बैल पोळ्या पर्यंत सण असतात.

सासरी काही जास्त व्रत वैकले जास्त केली जात नव्हती. वडील माळकरी होते.म्हणून माहेरी मात्र महिनाभर देव देव चालू असायचे. दिव्याच्या अमावस्या पासून सुरवात व्हायची.मातीचे घर आधी पूर्ण सारवले जायचे.जमीन शेणाने सारवली जायची.एकदम प्रसन्न वाटायचे. वापरात नसलेले दिवे मग बाहेर काढून घासून स्वच्छ केले जायचे. आजच्या सारख्या मोठ्या समया नव्हत्या तर मोठे मोठे दगडी दिवे होते. ज्याचे वजन अर्धा किलोच्या आसपास तरी असेल ,त्यात पाव किलो तेल सहज बसायचे.काचेचे दिवे,कंदील घासून लख्ख केले जायचे. पूजे पासून खरा श्रावण सुरू व्हायचा.घरात लाईट नव्हतीचं त्यामुळे प्रकाश देणारा दिवा देवा सारखा वाटत असायचा.माझे वडील हे आजोबांनी सोळा सोमवार व्रत केल्या मुळे झाले असे वडील सांगत, तेव्हा पासून गावातील मंदिरात पूर्ण श्रावण महिना नंदादीप लावला जायचं अर्थात ते काम गावातील गुरव करायचे.त्यांना महिना भर पुरेल एवढे तेल दर वर्षी दिला जात असे.

खरे तर श्रावण महिन्या मध्ये शेतात खूप काम असायचे.त्यामुळे वडील दर वर्षी रात्री नवनाथ ग्रंथाचे पारायण करायचे. संध्याकाळी शेतातून घरी आल्यावर जेवण  झाले की  पोथी वाचन सुरू होयचे.त्याकाळी आजच्या सारखे टीव्ही नव्हते .त्यामुळे जर कोणाची घरी पोथी असेल तर आजूबाजूचे सगळे पोथी ऐकण्यास येत असायचे.पोथी वाचताना नुसती न वाचता त्यातील अनेक प्रसंग वडील समजून सांगयाचे.मी कधी नवनाथ पोथी वाचली नाही पण दर वर्षी ती ऐकून त्या मध्ये काय आहे हे आज पण 
लक्षात आहे.पोथी समाप्तीला वाटली जाणारी खिरापत तेव्हा खूप आवडतं असायची.नागपंचमी सण म्हणजे मुला साठी आनंदच असायचा.एका छोट्या वाटीत मेहंदी भिजवायची कडेपेटीच्या काडीने ती लावायची.सकाळी उठल्या उठल्या मित्र मैत्रिणीनं दाखवायची.मोठ्या मोठ्या झाडाला बांधलेले झोके,त्यावर झोके घेण्याची मजा खूप वेगळीच असायची.
या महिन्यातील दुसरा सण जो घरात साजरा केला जायचा तो म्हणजे गोकुळ अष्टमी.
या दिवशी गंगेचे पाणी जी खरे तर गोदावरी आहे .तिचे पाणी कावडने  आणले जायचे.मग ते गावात मिरवले जायचे.दुसऱया दिवसी चपाती आणि गूळ यांचा काला ज्याला मलिदा म्हणतात तो केला जायचा.घरातील देव्हाऱ्यात कनिफनाथाचे ताईत असल्याने देव्हाऱ्यातील  देवाच्या आसनाचा कपडा आणि धागे बदलले जायचे.मंदिरावरील भगवा ध्वज बदलला जायचा .शिव मंदिरात शिव अभिषेक केला जायचा.आज पण घरात पोथी वाचली जाते आता वडील राहिले नाही.वहिनी न चुकता पारायण करते .मी लग्नाच्या आधी पासून शिवलीलामृत पोथीचे पारायण करते.अजूनही करते.वडिलांचे अनेक अध्याय पाठ होते त्याची मात्र आठवण येत राहते.
श्रावणा मधील शेवटचा सण बैल पोळा जो अमावस्याला असतो.या महिन्यातील सगळयात आवडता सण.आमच्या कडे असणारे बैल हे खूप गरीब असायचे त्यांना कोणी सोडत आणि बांधत.मग काय या दिवशी धमाल असे.त्यांना सजवणे .तयार करणे.त्यांच्या साठी पुरणपोळी बनवणे.आणि गावभर त्यांची मिरवणूक.
मला सगळ्यात आवडत असे ते सारवलेले अंगण त्यावरील रांगोळी.आज हि मन पुन्हा पुन्हा त्या अंगणात जाऊन पोहचते.अनेकदा पूजेला फुले नसायची तरी एक प्रकारची प्रसन्नता वाटायची जी आज किती फुलांची सजावट करून देखील वाटत नाही .नकळत मन मग त्या माहेरच्या अंगणात जाऊन पोहचते.

Saturday, 7 August 2021

बदलता प्रदेश बदलती भाषा

अभिजीत इनामदार यांचा एक लेख वाचून  मला मुंबईत नवीन आली तेव्हाचे दिवस आठवले.लग्न होऊन दोन वर्ष झाले होते.मी नवीन ठिकाणी म्हणजे दादर जवळच्या नायगाव पोलीस कॅम्प मध्ये राहायला गेले होते.तळ मजल्यावरील खोली होती.माझा साठी पूर्ण नवीन.

एकच मजल्यावर 20 खोल्या होत्या.मजेची गोष्ट म्हणजे पोलीस बिल्डिंग असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रांमधील लोक होते.माझ्या समोर रत्नागिरीकडील बाजूला कोल्हापुर कडील तर दुसऱ्या बाजूला सातारा येथील.काही मालवणी.अनेकजणी माझ्या सारख्या गावाकडून आलेल्या.प्रत्येकीचा बोलण्याचा टोन वेगळाच.त्यामुळे नक्की काय बरोबर काय चूक समजतच नव्हते.सगळ्यांना आम्ही बरोबर असे वाटून दुसऱ्यांना नाव ठेवणे त्यांच्या बोलण्यावर हसणे हे चालू असायचे.नाशिक कडे पोळी भाजी म्हणतात म्हणून इकडे म्हटल्यावर हसणारे भेटले.पोळी नाही चपाती म्हणायचे नाही तर बोलयचे.वरण भात नाही डाळ भात.असे बरेच शब्दवर मला हसले गेले.त्यासाठी सरळ घाटी हा शब्द वापरला जायचा.घाटी याचा अर्थ घाटावर राहणारे.पण येथे घाटी म्हणजे गावठी या अर्थाने अनेक वापरतात.

मुंबई बद्दल फक्त ऐकून होते।शहरातील भाषा वेगळी असते हे माहिती होते पण इकडे कोणती एक भाषा नव्हती.पण येथे एक गोष्ट मात्र शिकले मुंबई ही कोकण विभागात येते.इकडे कोकणातील लोक जास्त त्यामुळे त्यांच्या मता प्रमाणे ते जे बोलतात ,करतात ते सगळे बरोबर असते.याचा कधी चांगला कधी वाईट खूप अनुभव आला.अजून पण येत आहे.

एक वर्षात तिथे राहण्यास आणि भांडणास कंटाळून मी ठाण्याला राहायला गेले.तिकडे सगळे रायगड जिल्ह्यातील तिथे अनेकजण "ळ "चा उच्चार ल करायचे.

सासू सासरे गावी गेले आणि मी पुन्हा मुंबई सेंट्रल  येथे राहायला आले.इकडे सगळे कॅथलिक जास्त करून गोवा साऊथ इंडिया कडील.मग हिंदी जास्त.पण काही जे मराठी बोलतात ते खूप अजीब असते.आमची मद्रासी आंटी बोलते" मी कसा पन बोलू दे तुला समजा ना "
खरे तर मुंबई सगळ्यात मोठे शहर पण येथे कोणती एक शुद्ध भाषा कोणी बोलत नाही सगळी खिचडी.मराठी बोलणारे अर्धे इंग्लिश वापरतात.

पुण्याची भाषा शुद्ध असे बोलले जाते.पण आता राज्यातील कानाकोपर्या मधून मुले तिथे शिकायला आणि कामा साठी येतात.त्यामुळे तिकडे अशीच मिक्स भाषा ऐकायला मिळते.

मला या मधून एकच समजले तुम्ही काय बोलता हे समोरच्याला समजले पाहिजे बस.नाही तर साऊथ कडील भाषा ऐकताना आणि वाचताना "आपण अडाणी आहे,काळे अक्षर म्हैस बराबर"
परक्या भाषा बरोबर ना तुमची शुद्ध ना अशुद्ध भाषा चालते.काही बोलले तरी ना समोरच्याला समजते.ना ते काय बोलतात आपल्याला.

Tuesday, 3 August 2021

सोशल मीडिया आणि सायबर क्राईम

इंस्टावर,टिक टॉक वर अनेक जण व्हिडीओ बनवून फेमस झाले होते,आहेत.एक टाइम पास म्हणून मी अनेकदा हे व्हिडिओ पाहत असते.काही व्हिडिओ खरच सुंदर असतात.पण काही का व्हिडिओ बनवतात ??असा प्रश्न अनेकदा पडला आहे.

 ग्रामीण भागातील अनेक मुले मुली यात मोठया प्रमाणावर दिसतात.त्यातून अनेकांचे कलागुण समोर देखील आले आहेत.परंतु एकाने बनवले म्हणून दुसरा बनवतो असे अनेकदा दिसून येते.अनेक आईवडिलांना आपली मुले काय करतात याचा पत्ताच नसतो.मनोरंजन करणे आणि कलागुण दाखवणे प्रत्येकाचा हक्क नक्कीच आहे.परंतु आपण वापरत असलेला शोशल मीडियाचे पण काही नियम आहेत याची माहिती घेणे गरजेचे आहे.

बोलण्याचा अधिकार आहे.किंवा काही कलागुण दाखवण्याचा अधिकार नक्कीच आहे.पण काही गोष्टी न करणे कायद्याने बंधनकारक आहे याची माहिती असायला हवी.

अनेकांना सायबर क्राईम बद्दल माहितीच नसते.केवळ लाईक मिळतात.कॉमेंट्स येतात.आपले फॉलोर्स वाढतात हेच बघतात.आपण गुन्हा करतो याची त्यांना जाणीव नसते.एक दिवस अचानक कारवाई होते तेव्हा मग रडण्या शिवाय पर्याय नसतो.

मागे एकाने हातात कोयता घेऊन एक व्हिडिओ अपलोड केला होता.नंतर पोलिसांनी त्यावर कारवाई केली.एवढेच नाही तर त्याला गावातून एक चक्कर मारून आणले.उद्देश हा की बाकीना समजावे.काही काळा साठी फक्त लाईक कॉमेंट मुळे खुश झालेला त्याला नंतर किती अपमानित वाटले असणार.

अनेक जण पोलिसांची खिल्ली उडवणारे व्हिडिओ बनवतात.त्याना पण शोधून त्यांच्यावर देखील कारवाई होतेच.

हे सगळे आज लिहिले कारण आजच बातम्यांमध्ये बघितले.एक पोलीस कर्मचारी याने हातात पिस्तुल घेऊन असाच एक व्हिडिओ बनवला.आता त्याच्यावर कारवाई होणार आहे.कदाचित काही दिवस त्याला निलंबित करतील.पोलीस चुकीचे वागतात म्हणून कोणी त्यांच्या कडे बोट दाखवू नाही म्हणून कडक कारवाई देखील केली जाईल.

कलागुण दाखवा त्याचा आनंद पण घ्या.परंतु ते करत असताना आपण कुठे कायद्याच्या कचाट्यात सापडत नाही ना याचा विचार नक्की करा.
असेच मनातले काही.
आशा नवले

Sunday, 1 August 2021

मालिका आणि आपण

अनेकदा मालिका चांगल्या नसतात म्हणून अनेक जण येथे लिहितात .
मी जास्त मालिका बघत नाही बातम्या बघत असते.नाही तर गाणे ऐकते .
माझ्या लग्नाच्या आधी आमच्या घरी टीव्ही नव्हता.तसे तेव्हा खेड्यात सगळ्याकडे टीव्ही नसत.मला तेव्हा टीव्हीचे खूप आकर्षण होते.लग्न झाले मुंबईत आले.तेव्हा आमच्या कडे कलर टीव्ही नव्हता.पण टीव्ही आहे हेच माझ्यासाठी खूप होते.
तेव्हा मुबई मध्ये दोन च्यानल होते मुबई साठी मेट्रो म्हणून {नक्की आठवत नाही पण हेच नाव असावे }त्यावेळी रविवारी छान मालिका असत म्हणून लवकर उठून सगळी कामे करून टीव्ही बघणे हा आवडता कार्यक्रम असे .पण आज मी मालिका बघत नाही.
आता मी हे का सांगत आहे .......
अनेक घरात महिला अतिशय मालिका बघत असतात.हे अगदी शहरात नाही तर
खेड्यात देखील.हे मी निरीक्षणातून लिहित आहे.शहरात गृहिणी असतात काही काम नसते वेळ जावा म्हणून यात महिला अडकतात.तर खेड्यात काम असून देखील एक वेगळे जीवन मालिके मधून समोर येते म्हणून अनेक महिला या मालिका बघत असतात.खेड्यात मालिके मधून दिसणारे मोठे घरे, भारी साड्या
या सगळ्याचे खूप वेड दिसून येते.किवा सासू कशी वागते सून कशी वागते हे बघणे त्यांना आवडते.
पण एक गोष्ट खरी आहे जश्या महिला मालिका बघतात तसे अनेक पुरुष
देखील या मालिका वेडे दिसून येतात.
मी आज हे सगळे लिहित आहे कारण आज मालिका बघून त्यातील पात्र आणि
त्यांच्या जीवनात जे घडते त्याचा काही महिला वर खरच परिणाम होतो
त्या नकळत एखाद्या पात्रा बरोबर भावनिक जोडल्या जातात.
अगदी ती व्यक्ती आपली कोणी आहे असे त्यांना वाटते. मग तिचे सुखदुख त्यांना आपले वाटायला लागते.
अशीच एक माझ्या ओळखी मधील एक चाळीश पंचेचालीश ची महिला काही वर्षा
पूर्वी येणारी मालिका सात फेरे बघत असे त्यातील सलोनी म्हणजे आपली मुलगी आहे असे त्या महिलेला वाटायला लागले.तिचा बरोबर काही चांगले घडले दाखवले कि हि एकदम खुश सगळ्यांना सांगणार बघा आज सलोनी बरोबर हे झाले ते झाले.काही वाईट दाखवले कि दिवसभर दुखी,मग तिचा दिवस वाईट सगळ्यांना तेच सांगत राहणार बघा कसे होते तिचा बरोबर,
आधी आधी सगळे ऐकत नंतर तेच तेच मग कोणी लक्ष देत नसे.
तिच्या मुलांनी तिला ते पात्र करणाऱ्या त्या मुलीला भेटून देखील आणले
दिवसभर शुटींग दाखवले जे करतो ते खोटे असते हे समजावले.
पण काही फायदा झाला नाही.मालिका आणि त्या बद्दलचे वेड वाढत गेले.
घरातील टीव्ही काढून टाकला मग ती कोणच्या घरात जाऊन टीव्ही बघत असे.
कधी कोणी भेटले तर फक्त मालिके बद्दल बोलत असे.हळूहळू तिला बायका
टाळू लागल्या.
एकदा तर ती त्या मालिकेच्या निर्मात्या बरोबर जाऊन वाद घालून आली,
तुम्ही असे का दाखवतात म्हणून.आता ती ठीक आहे .पण तेव्हा पासून मात्र
माझे मालिका वेड कमी झाले.कारण माझ्या पण लक्षात आले.आपण एखादी मालिका जेव्हा बघतो तेव्हा नकळत आपल्या आवडत्या पात्राच्या सुखदुखात नकळत सामील होतो .त्याचा असर थोडा तरी होतो.
तेव्हा पासून टीव्ही बघायचा पण उद्या काय होणार अश्या मालिका बघायच्या नाही .एखादा चित्रपट बघायचा विसरून जायचे.त्यात उद्या काय होणार याचे टेन्शन नसते .
असेच मनातले काही
आशा ६/६/१५