Sunday, 29 March 2015

आई

आई वर रोज खूप पोस्ट येतात ,आई नावाचे अनेक ग्रुप देखील आहे .
अनेक जन खूप पोस्ट शेअर देखील करतात .
हे सगळे बघून मनात येते खरच एवढ्या पोस्ट असतात .ते सगळे आपल्या 
आई वडिलांना विचारतात का ?
छोट्या छोट्या गोष्टी साठी आई हवी असते लहानपणी ,
पण मोठे झालो कि आपण सोयीस्कर विसरतो आपल्यला
शिकवणारे आई वडील आहेत .
आपण लहान असतो भरभर चालू शकत नाही म्हणून आई
आपल्या चालण्याच्या वेगाने चालते मग किती वेळ लागो .
आपण जेवत नाही म्हणून दहा वेळा मागे लागते .
आपल्याला जेवण आवडले नाही तर किती दमली तरी लगेच
दुसरे काही तरी बनवते .
स्वताची आवड विसरते .
पण आपण काय करतो ,आपल्यातील किती जण आईच्या आवडी
निवडीचा विचार करतात .आपण मोठे होतो आई वयस्कर होते .
ती दमते हळू चालते म्हणून किती जन आहे तिचा बरोबर
फिरणारे .आईला जेवली का ती जर नाही बोलली तर किती
जण आहे तू बस माझा बरोबर ,तू जेव आधी मग मी जेवेन
असे बोलतात .
किती जण तुला नाही आवडत थांब तुला दुसरे काही आणतो बोलतात .
आपले मुल लहान आहे म्हणून कुठे न जाणारी आई साठी ती नाही येत तर
मी नाही जात बोलतात .
पण फेसबुक वर किती आई प्रेम दिसते ना ?
म्हणून आज असेच मनातले काही
!!आशा !!२९/३/१५

Friday, 27 March 2015

संस्कार


काही गोष्टींचा प्रभाव आपल्या मनावर खूप खोल होतो ना?
आपल्या नकळत आपल्याला कोणी तरी काही तरी शिकवून जाते ,आपले विचार बदलून जातात ,परंतु तो प्रसंग कायमचा लक्षात राहतो .मी तेरा चौदा वर्षाची असेल तेव्हाचा प्रसंग आहे .आमच्या गावात तेव्हा दुष्काळा मुळे रोजगार हमीचे कामे चालू होते .त्या साठी एक पाटबंधारे खातेचे एका अधिकारयाची नेमणूक झाली होती .ते आमच्या गावात राहायला आले होते .त्यांना पाच मुली होत्या .सगळ्या छान स्वभावच्या होत्या .शहरातून आल्या होत्या .सुंदर हुशार होत्या पण अजिबात अभिमान नसलेल्या होत्या .त्याची लाइफस्टाइल अलग होती म्हणून तेव्हा सगळ्यांना त्याच्या बद्दल एककुतूहल होते .आणि त्याची पण सगळ्याशी मैत्री होती .अगदी त्यांच्या घरी भांडी धुणे करायला येणर्या बाई आणि तिचा मुली बद्दल देखील ते खूप छान बोलत .त्यांना आपल्यात खेळायला घेत .एकदा आम्ही सगळ्या त्यांच्या घरी जमा झालो होतो .गप्पा चालू होत्या.आणि त्याच वेळी तिथे त्यांच्या भांडी घासणाऱ्या बाईची मुलगी आली .तिने नवीन फ्रॉक घातला होता .आणि त्याचा रंग तिला अजिबात सुत होत नव्हता .त्यात ती चांगली दिसत नव्हती .ती बोलली "ताई कसा आहे माझा फ्रॉक ? छान आहे ना ?"आमच्या मधील कोणी तरी एकदम "ये" असे बोलले आणि त्याच वेळी अधिकारयाची दोन नंबरची मुलगी एकदम बोलली थांब ग ! तिनी मला विचारले आहे .मी सांगते .तिनी त्या मुलीला जवळ बोलावले .तिला बोलली ."वा ! किती छान आहे तुझा फ्रॉक ," कुठे शिवलास आणि हा कपडा कोणी घेतला .त्यावर त्या मुलीने सांगितले आईने घेतला कपडा ,शेजारच्या काकूने शिवला .छान आहे ना ? ताई.त्यावर ती मुलगी बोलली हो ग ,खूप छान आहे .पण याचा रंग जर वेगळा असता ना तर अजून खूप छान दिसला असता .पण हा सुद्धा छान आहे .ती मुलगी हिचे बोलणे एकूण खुश झाली आणि आनंदाने निघून गेली .ती गेली आणि सगळ्या मुली एकदम बोलल्या ,"काय पण रंग होता तिला अजिबात चांगला दिसत नव्हता
या वर तिनी खूप सुंदर उत्तर दिले ,
"हो मला माहिती आहे ,तिचा फ्रॉकचा रंग चांगला नव्हता तो तिला चांगला दिसत
नव्हता ".पण विचार करा ती किती आनंदाने मला विचारायला आली होती .
जर मी तिला बोलले असते .हा काय रंग आहे ? काय पण दिसते तू यात .
अजिबात चांगली नाही वाटत .तर काय झाले असते ती नुसती दुखी झाली नसती तर कदाचित तिनी
तिनी घेतला असेल .तिला जे चांगले वाटले तिने ते घेतले .
मग आपण का मन दुखवायचे तिचे सांगा .
आपण जर कोणाला आनंद देऊ शकत असेल तर तो द्यावा .त्यांनी आपला काही फायदा 
होत असेल का नाही तो वेगळा प्रश्न पण आपल्या एक शब्दाने कोणी खुश होत असेल 
तर काय हरकत आहे चांगले बोलयला नाही का ?
खूप वर्ष झाली या गोष्टीला सत्तावीस आठ्ठ्वीस वर्ष झाले पण ती गोष्ट मी कधी नाही विसरले .
भाषा असी असावी त्याला काय योग्य ते समजले पाहिजे मन पण दुखावले जाणार नाही .
असेच मनातील काही !!आशा!! २७/३/१५


Thursday, 26 March 2015

दोघे

काय असते प्रेम?
काय असते प्रेम? प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगळी असते ना? कोण नुसते बघून प्रेमात पडते तर, कोणी विचारांच्या प्रेमात पडतात. कोण सहवासाने प्रेमात पडतात. काही मनातले बोलतात तर कधी कोणी बोलू शकत नाही. फेसबुकचे आभासी जग येथे, पण न बघता प्रेमात पडणारे काही कमी नाहीत. काहींची लग्ने देखील फेसबुकमुळे जुळून आली.
असाच तो एक लाजरा, स्वप्नाळू, सुंदर लिहिणारा. वाचनाची आवड असणारा. एक सुंदर पोस्ट वाचून रिक्वेस्ट पाठवली. कधी कधी बोलणे होयाचे. ती बोलायची हा शांत पणे वाचायचा. हळूहळू तिच्याशी बोलणे वाढले. एक दिवस भेटायचे ठरले.
सुंदर नदी किनारा. तो तिची वाट बघत बसला. थोडा आधीच आला होता. आज तो प्रथमच तिला बघणार होता. दूर वरून ती येताना त्याला दिसली. तो थोडा शॉक झाला. कारण ती साडीत होती. त्याने वेगळी कल्पना केली होती तिचा बद्दल. ती जसजशी जवळ आली तसतसे त्याच्या लक्षात आले. ती त्याच्या पेक्षा मोठी होती. मग त्याच्या लक्षात आले, अरे आपण तिला कधी विचारले नाही. तिचे वय काय आहे?
हॅल्लो .....विचारातून बाहेर येऊन त्याने वर बघितले. ती एकदम जवळ येऊन उभी होती. खूप सुंदर होती ती. पण त्याला वाटले तशीच मोठी होती ती त्याच्या पेक्षा. बस! तो बोलला. ती बसली. ओळखला ना बरोबर तुला? ती बोलली. त्याला काय बोलावे समजले नाही. तो समोर पाण्याकडे बघत बसला. काय बोलावे त्याला समजत नव्हते. ती त्याच्याकडे बघत होती. किती साधा आहे हा, तिच्या मनात आले. स्वप्न बघणारा, स्वप्नात रमणारा, पण याला नाही माहिती अजून स्वप्न आणि सत्य खूप भिन्न असते. लहान आहे अजून ना हा! ती स्वत:शीच बोलली. छान आहे ना हे ठिकाण? ती बोलली. आवडले का? माझे आवडते ठिकाण आहे हे! तो बोलला. जेव्हा मला खूप एकटे वाटते तेव्हा मी येथे येऊन बसतो. अगदी ती गेली तेव्हा देखील. नकळत तो बोलून गेला आणि मग शांत बसला. तिला माहिती होते, त्याला आवडणारी ती लग्न करून गेली होती. खूप प्रेम करत असूनही तो तिला सांगू शकला नव्हता. त्याच्या बद्दल तिला सगळे माहिती होते. पण स्वत:बद्दल ती कधी काही बोलली नव्हती. तिला त्याच्याशी खोटे नव्हते बोलायचे, पण त्यांने एक दिवस तिला सांगितले. तो तिच्यावर प्रेम करायला लागला आहे. तिने त्याला काही उत्तर नाही दिले. आपण भेटू मग बोलू! असे ती बोलली. आज ती त्याला भेटायला आली होती. खूप वेळ शांतेत गेले. मग ती बोलली, बोलणार नाही का तू काही? खरे तर त्याला खूप बोलायचे होते. पण काय बोलावे समजत नव्हते. शेवटी तो बोलला. तुझ्याबद्दल सांग ना काही? तू लग्न का नाही केले? सुंदर तर आहेस ना? ती उदास हसली. तिला तसे हसताना बघून त्याला खूप वाईट वाटले. दूर वर बघत पाण्यात खडे फेकत ती बोलायला लागली. मी कधी तुझ्या सारखी होती रे! खूप स्वप्न बघणारी, पण आपण जे ठरवतोे ते होते का कधी? घरात सगळ्यात लहान मी. सगळ्यांची लाडकी होते मी. बारावी पर्यंत शिक्षण झाले. मग घरात लग्ना बद्दल बोलणे सुरु झाले. जवळच्या नातेवाइकामधील मुलगा होता. आई वडिलांनी आधीच ठरवले होते. मग बोलणे झाले आणि छोटा कार्यक्रम ठरवून आमची अँगेजमेंट झाली. घरात लग्नाची तयारी सुरु झाली. आणि एक दिवस होणारा नवरा घरी येत असताना एक छोटा अपघात होऊन त्यात तो थोडा जखमी झाला. काही दिवस दवाखाण्यात राहिला. त्याचे खूप नातेवाईक भेटायला आले. आणि त्यातील एका आज्जीने शंका काढली. मुलीची पत्रिका बघितली होती का? झाले पत्रिका बघितली गेली आणि माझ्या पत्रिकेत कडक मंगळ आहे, असे समजले. मग काय अपघात झाला तो त्या मुळे असा ग्रह करून घेतला, सगळ्यांनी. कोणीही विचार न करता लग्न मोडून टाकले. मग काय सगळ्यांना लग्न मोडल्या मुळे माहिती झाले की मला कडक मंगळ आहे. मग राहूनच गेले लग्न. मी पण लग्नाचा विचार सोडून दिला. पुढे शिक्षण पूर्ण केले. आता एका शाळेत शिक्षिका आहे. तू मला प्रपोज केले. पण माझ्या बद्दल तुला काही सांगावे म्हणून आज तुला येथे भेटायला आले.
खूप वेळ दोघे शांत बसले. चल खूप उशीर झाला. जाऊ या का? ती उठून उभी राहिली. तो पण उठला आणि तिच्यासमोर आला. माझ्याशी लग्न करशील? त्याने तिच्या डोळ्यात बघत विचारले. पण मी तर मंगळीक आहे ना? ते मी नाही मानत हे काही. तू तयार आहेस का बोल. पण मी तर तुझा पेक्षा मोठी आहे रे! काय फरक पडतो? काही वर्षांनीच मोठी आहेस, बोलना? त्याने तिचा हात हातात घेतला. हा हात आणि तुझी साथ आयुष्यभरा साठी देशील ना? तिने नजरेनेच त्याला होकार दिला. आता तिच्या डोळ्यात खूप सारी खुशी होती आणि भावी संसाराचे स्वप्न...
दिनांक: २१ एप्रिल, २०१५
फोटो -गुगल सर्च 

Saturday, 14 March 2015

मृगनयनी

मुंबईतील एक हॉस्पिटल ,बाहेर प्रचंड गर्दी परंतु आता मध्ये एक भीतीदायक शांतता.
काळजीने बसलेले चेहरे ,नर्सची धावपळ औषधाचा वास ...पहिल्या मजल्या वरील महिला वार्ड नंबर आठ ....त्या वार्ड मध्ये ४ नंबर बेडवर कोपर्यात ती .दहा खाटा असलेले ते छोटे वार्ड होते .त्यातील एका कोपऱ्यात तिची खाट होती .कोण होती ती कोणाला माहिती नव्हते ,ती कोणाशी बोलत नसे .पण खूप दिवसा पूर्वी तिला कोणी तरी येथे सोडून गेले होते .परत बघयला आलेच नाही .कोणाशी बोलत नसे ती तीच्या कडे नर्स पण जास्त जात नसत ,फक्त तिला रोजच्या गोळ्या दिल्या जात असे .साधारण पाच फूट उंच असेल ती ,आजारी असून तब्यातीने कृश झाली तरी मुळात ती खूप सुंदर असावी .गोरी काळे भोर मस्त केस ,आणि कोणच्या नजरेत भरणारे तिची अतिशय सुंदर डोळे ,हो तिचे डोळे खूप सुंदर होते बघता क्षणी कोणाला आवडावे .पाणीदार काळे डोळे ,मृगनयनी म्हणावे असे .कोणी तिला बघून "हिचे डोळे काय सुंदर आहे असे बोलत "पण त्या डोळ्यात एक हतबलता आणि उदाशी नेहमी दिसत असे .कोणाची तरी वाट बघत असल्या सारखे कोणच्या तरी प्रतीक्षेत असलेले .बाकीच्या पेशण्टला नातेवाईक भेटायला येत तिला कोणी भेटायला येत नसे .त्या वेळी तिच्या नजरेत एक व्याकुळता दिसत असे .काय झाले होते तिला ?तिला एड्स झाला होता .आणि हा आजार तेव्हा नवीन होता .त्याच्या बद्दल खूप काही माहिती नव्हती .त्या मुळे अशा लोकना कोणी हात देखील लावत नसत .त्या मुले नर्स देखील तिचा जवळ जात नसत .परंतु डॉक्टर मात्र तिला तपासात तीचाशी बोलत .आणि हेच कारण असावे ती कोणाशी बोलत नसे .आणि कोणी तिचा कडे बोलायला जात नसे .शांत पडून राहणारी ती मात्र एक दिवस रात्री उठली आणि सगळ्याचे सामान मध्ये काहीना काही घेतले आणि त्या सगळ्या वस्तू खाण्याच्या होत्या .कारण तिला हॉस्पिटल मध्ये जेवण मिळत असे तेच ती खात असे .सकाळी झाली सगळ्यांना समजले तिनी कोणाचे ना कोणाचे काही घेतले .काही काही बोलल्या नाही परंतु स्वतचा विचार करणाऱ्या त्यांना नाही आवडले तिनी त्यांच्या वस्तूला हात लावला ते .मग त्यांनी तिची कॉम्प्लेंत केली .मेन नर्स तिला ओरडली .तरी ती काही बोलली नाही पण तेव्हा तिचा डोळ्यात जगाचा राग दिसला .आणि त्या रात्री मध्यरात्री तिने अचानक जोरजोरात ओरडण्यास सुरवात केली .आदळआपट सुरु केली .नर्स धावत आल्या सगळे उठले .ती कोणाचे ऐकत नव्हती .डॉक्टरांना बोलावले गेले तिला ऑक्सिजन मास्क लावला गेला झोपेचे इंजेक्शन दिले गेले .ती नंतर शांत झाली .दुसर्या दिवशी ती तशीच पडून राहिली .परंतु रात्री ११ वाजले आणि तिनी मास्क काढून टाकला .ऑक्सिजन सिलेंडर लातेने पडून दिले .आता तीची धडपड चालू होती ,खूप व्याकूळ झाल्या सारखी .आज ती प्रथमच माझी मुले ,माझी मुले असे काही बडबडत होती तिची ती हाल बघून सगळ्यांना खूप वाईट वाटले कदाचित तिला मुले असावी आणि तिला त्यांची आठवण येत असावी .डॉक्टर आले परत तिला इंजक्शन दिले मास्क लावला ,परंतु तिची ती धडपड शेवटची ठरली .सकाळी सगळे उठले तेव्हा समजले ती रात्रीच कधी या जगातून गेली .तिची बॉडी घायला आले तेव्हा ,सगळ्यांनी बघितले .तिचे ते सुंदर डोळे तसेच उघडे होते .कोणाच्या तरी प्रतीक्षेत असल्या सारखे ......{एड्स झालेली व्यक्ती जगत नाही ,तिनी काही चुकीचे वागले असणार म्हणून तिला हा आजार झाला हा एक मोठा समज होता .म्हणूनच तिला कोणी सोडून गेले असेल का ?कोणी आपल्यला पापी म्हणून नाही म्हणून ती कोणाशी बोलत नसेल का ?असे खूप प्रश्न सोडून ती गेली .}
आशा  १४/३/१५ 

Wednesday, 11 March 2015

पिझ्झा .......


कुठे भेटणार आहेस ?लवकर सांग .
का भेटायचे सांग .
तूच बोलतेना माझ्या एक पण वाढदिवसाला तू मला काही गिफ्ट देत नाही ,
पार्टी देत नाहीस ,चल आज तुला मी पार्टी देतो .
हो का ?मग मी काय खोटे बोलते का ?तुला नेहमी तुझे फ्रेंड आणि फ्रेंड ,त्यांना नेहमी देतो 
पार्टी मला दिली का कधी ? ती 
तो ,आता देतो आहे ना ? ये मग लवकर ,
ती ,ठीक आहे पण कुठे येऊ सांग आणि काय पार्टी देणार ते पण सांग .
तो ,ठीक आहे ये तू स्टेशन च्या पुढे जे सिग्नल आहे तिथे मग ठरवू कुठे जायचे ते .
तिला बाहेर खाणे आवडत नसे पण तरी तिला काही वेळ त्याच्या बरोबर घालावयाचा होता .म्हणून ती स्वताच्या बर्थडे पार्टी त्याच्या कडे मागत होती .आज तीन महिन्यांनी तिला 
तो भेटणार होता .काही खाण्या पेक्षा काही वेळ त्याच्या बरोबर राहायला भेटणार यातच 
ती खुश होती .भरभर ती तयार झाली .त्यांनी सांगितले तिथे गेली .
समोरच तो उभा होता .
ती,कुठे जायचे सांग? ,त्याला बघून ती खुश झाली .
तो ,चल एम. जी रोडला जाऊ ,तिथे छान हॉटेल आहे .
ती,ओके पण रिक्षाने जायचे .ये शेरिंग नाही ,स्पेशल .
रिक्षा मध्ये बसले खरे तर तिला खूप बोलायचे होते ,पण त्याचे लक्ष कुठे होते ,
तो मोबाईल मध्ये गर्क झाला होता .whatsup वर मेसेज बघत होता .
तिच्या लक्षात आले ती शांत बसली ,उदास झाली .
खूप वेळाने त्याच्या लक्षात आले ती काही बोलत नाही .बाहेर कुठे तरी बघत आहे .
अग बोल ना ?तो 
तिनी त्याच्या कडे बघितले ,तिच्या डोळ्यात पाणी होते .त्यांनी चुपचाप मोबाईल 
ठेवून दिला .
रिक्षा थांबली ,ती उतरली तो पैसे देत होता .तिचे लक्ष समोर गेले.
समोर डॉमिनोज पिझ्झा शॉप ,
तिनी कधी हि पिझ्झा खाल्ला नव्हता .ती मागे वळली आणि त्याला म्हणाली ये 
आपण पिझ्झा खाऊ या ना .
तो बोलला नको ,पिझ्झा आपण बाजूच्या हॉटेल मध्ये जाऊ छान व्हेज हॉटेल आहे .
तिचा मूड ऑफ झाला .पण ती काही बोलली नाही .चुपचाप त्याच्या बरोबर गेली .
खरे तर तिला ते हॉटेल आवडलेच नाही .
काय खाणार सांग ,? तो 
काही पण ,ती 
त्यांनी स्वतासाठी मेंदुवडे सांबर मागितले .तिच्या साठी हॉटेल स्पेशल लंच .
तो परत मोबाईल मध्ये बिझी झाला ती चूप बसली ,जेवण आले ,तिला न आवडणारी 
दुधी भोपळ्याची भाजी .होती .तिने काही न बोलता खाण्यास सुरवात केली .
त्याचा आता पण लक्ष नव्हते .अचानक त्यानी बघितले .भाजी चिवडत बाहेर बघत बसली .
खरे तर किती उत्सहाने आली होती ती .मला पार्टी देणार होता ना मग ,काय झाले असते .पिझ्झा खायला गेलो असतो तर ,का केले याने असे ,पिझ्झा महाग असतो का ?
म्हणून नाही बोलला का हा ,?पण मग का नाही बोलला तसे ,आपण दिले असते ना पैसे ?
खरे तर मी कधी पिझ्झा खाल्ला नाही .किती छान दिसते शॉप बाहेरून सगळे मस्त फ्रेश ,
एक छान आठवण राहिली असती ना त्याच्या बरोबर ,का ?एवढे पण नाही ऐकले तू ,तसे कधी कोणी आपले काही एकते का ?
कोणाला कुठे माहिती आहे ,आपल्याला काय आवडते ,काय नाही .
पण तू मी बोलले तरी का नकार दिला ,तिच्या डोळ्यात पाणी आले .
काय ग ?आवडले नाही का जेवण ,त्याचा आवाज ऐकला आणि तिनी त्याच्या कडे 
बघितले .
तिच्या डोळ्यात पाणी होते .तो एकदम चपापला ,काय झाले ग ?खात का नाही जेवण नाही
आवडले का ?
हो खूप आवडले माझ्या आवडीची भाजी आहे ना ,नाही का ?
तू बघ तुझा मोबाईल ,चालू दे तुझे मी तुझा बरोबर काही वेळ घालवावा म्हणून आले होते .
पिझ्झा खायचा होता तर हि भाजी .
तो उठला असू दे चल जाऊ आता पिझ्झा खायला तो बोलला .ती बोलली नको आता आधी नाही आलास .
जेवण संपवून बाहेर आले चाल मला जायचे आहे तो बोलला .
थांब ना थोडे बोलू या ,परत कधी भेटशील महिती नाही .
चल येथे बसू .असे म्हणून डॉमिनोज पिझ्झा शॉप च्या बाजूला ते एका ओट्या वर बसले 
तिला खूप बोलायचे होते .पण आता तिला काही बोलू वाटत नव्हते ,थोडा वेळ बसून ती
त्याला बाय म्हणून निघून गेली .
आज काही काम होते त्या बाजूला ती गेली .
समोर पिझ्झा शॉप बघितले आणि तिला त्याची खूप आठवण आली .
अजून पण तिनी पिझ्झा खाल्ला नव्हता .
कारण तिनी ठरवले आहे पिझ्झा खाणार तर त्यानी दिला तरच ,
पण आता ते शक्य नाही हे माहिती आहे तिला ,कारण आता तो तिला सोडून 
दुसरा कोणाचा झाला आहे .
हे त्याच दिवशी तिला समजले होते म्हणून तो तिचा बरोबर असून पण तिचा बरोबर नव्हता .

११/३/२०१५.

Wednesday, 4 March 2015

पोळीपुरण





आज होळी .....

होळी म्हणजे पुरणपोळी हवीच हवी ,आज देखील मराठी लोका मध्ये बनवलीच जाते ,पोळी बनवणे पण एक कला आहे असेच म्हणायला हवे .किती सोपस्कार करून तयार होते पुरण पोळी ....मला पुरण पोळी आवडत नाही ,म्हणून आई किती रागावली किती ओरडली तरी लग्न आधी मी कधी पुरण पोळी लाटून बघितली नाही .शक्यतो होळी असते तेव्हा शेतातील बरेच काम आटोपलेली असतात .पूर्वीच्या काळी लोक जास्त करून गावात राहत .आजच्या सारखे वस्त्या जास्त नव्हत्या .शेतातील बाजरी गहू किवा बाकी सगळे गावात वाहून नेले जात असे,ते जिथे ठेवत किवा तिथेच ते तयार करत असत त्याला खळे म्हणत .म्हणजे काय होळीच्या वेळी लोक थाडे रीलेक्स असत .धान्य तयार झालेले असे लोक आनंदात असत .झाडाची जुनी पाने सगळे गळून गेलेली असत .नवीन पालवी येण्यास सुरवात झालेली असे .अशा वेळी येणार हा सन मग पुरण पोळी केली जात असावी .माणसे जास्त असत मग कुणा कडे एक किलो डाळीचे नाही तर त्या पेक्षा जास्त पुरण केले जात असे .आजच्या सारखे gas नव्हते मग रात्रीचे जेवण दुपार पासून सुरु होत असे .चुलीवर डाळ शिजत घातली जात असे .डाळ शिजवून झाली कि त्यातील पाणी बाजूला काढून ठेवले जाई .त्याची कटाची आमटी {ज्याला आमच्या कडे सार म्हणतात }बनवली जाते .डाळी मध्ये गुळ बारीक करून टाकला कि ती डाळ चुली समोर चुलीतील आहार बाहेर काढून त्यावर काही वेळ ठेवत .गुळ थोडा मिक्स झाला कि वेलची ,सुंठ घातली कि झाले पुरण मग ते पाट्यावर वाटयला लागत असे .येथ पर्यंतचे काम नेहमी माझ्या कडे असे .पुरणपोळी साठी पीठ अलग पद्धतीने भिजवले जात असे .आजच्या सारखा त्यात मैदा मिक्स केला जात नसे .पीठ आधी चाळणीने चाळून नंतर ते पुन्हा पातळ कपड्याने चाळून घेतले जात असे .मग ते भिजवले म्हणजे मळून घेतले जात असे .नंतर सुरु होत असे म्हत्वाचे काम आणि ते म्हणजे पोळ्या लाटणे जे मला अजिबात आवडत नसे .मला पुरण पोळी आवडत नाही मग मी का करू ?असे मी म्हणत असे यावर आईचे ठरलेले उत्तर नवर्याच्या घरी जायचे आहे ना ?सगळा स्वयपाक येतो आणि जर पुरण पोळी नाही आली तर काय उपयोग .पोळी पण कशी हवी पीठ कमी आणि पुरण जास्त ....पोळी असी नुसती हातात घेतली तरी तुटली पाहिजे .तोडायला नाही लागली पाहिजे .आई अशाच पोळ्या करत असे भरपूर पुरण आणि कमी पीठ ..मैदा अजिबात नसे त्यामुळे ती अनेकदा पोळी फुटण्याची जास्त शक्यता जास्त आसायची ...एकच वेळी पोळी लाटायची पण आणि ती भाजायची हे कैशाल्याचे काम असे .कारण चुलीवर या दोन्हीचा ताळमेळ बसवणे खूप अवघड काम असते .आणि ते मला जमत नसे .म्हणून मी करतच नसे .लग्न झाले सासू उत्तम जेवण बनवत असे.माझी आई छान पुरण पोळी बनवते आणि मला पुरणपोळी खूप आवडते असे नवऱ्याने सांगून टाकले .आता काय करणार करायला पाहिजे ....डाळ शिजवली गुळ मिक्स केला पण आता येथे तर चुलीतील आहर नाही मग काय करायचे सासूला विचारले ती बोलली gas बारीक करून त्यावर ठेव .हळूहळू गुळ पातळ झाला .बापरे जास्त पातळ झाले आता काय ?मला तर काही समजेना काय करू ,सासूला कसे विचारू ,तुझा आईने तुला शिकवली नाही का ?असे जर बोलली तर ,उगीच आईचे नाव मध्ये नको यायला आता काय करू समजेना .परतू हलवत राहिले आणि हळूहळू पुरण परत घट्ट झाले .आणि माझ्या जीवात जीव आला .पीठ मळतानी नुसते पीठ नाही तर त्यात अर्धा मैदा घेतलेला असे .त्यामुळे पोळी करातांनी पोळी अजिबात फुटत नव्हती .मला खूप गम्मत वाटली .आणि पोळी लाटणे मला खूप सोपे वाटले .तेव्हा पासून ते आता पर्यंत पोळ्या मस्त जमतात ,तरी आई सारख्या नाही जमत .मी मैदा न टाकता पुरण पोळ्या करण्याचा प्रयत्न करते .स्वता करून सुद्धा आज देखील मला पोळी आवडत नाही .हुश्य संपले एकदाचे पुरण पोळी प्रकरण ..................

चव

चव 
माझी आई ना खूप छान जेवण बनवते .मला तर माझ्या आईच्या हाताचे जेवण 
खूप आवडते ,असे आपणच नाही तर आपल्या आजूबाजूला असणारे मग ते कोणी असो नातेवाईक मित्र सगळ्यांना आपल्या आईच्या हातचे जेवण आवडत असते .
मग जगातील कुठे किती चवदार काही खाल्ले असेल तरी सुद्धा आपली आईच जगातील 
बेस्ट कुक वाटते .
असे का बरे ?
आपण जेव्हा पासून अन्न खाण्यास सुरवात करतो तेव्हा पासून आईच्या हाताने खातो .
तिनी बनवलेले खात असतो .{कधी याला अपवाद आज्जी किवा आणखी कोणी असते }
अन्नाची चव आणि त्याची ओळख आपल्याला सर्वात आधी होते ती आईने बनवलेल्या
पदार्थ पासून .
मग ते आईने बनवलेले काही असो अगदी लसणाची चटणी किवा भाकरी असो .
माझी आईच छान भाकरी बनवते असेच आपल्याला वाटत असते .
अगदी आपले लग्न होते जर मुलगी असेल तर ,दुसर्या घरात आपण जातो .
त्या घरातील पदार्थ करण्याची पद्धत अलग असते .तरी माझी आई असे बनवते
आणि तेच छान असते यावर आपले ठाम मत असते .
मुले जेव्हा बायको घरात येते .तेव्हा तर लग्नाला किती वर्ष झाले तरी .
"माझी आईना हि भाजी खूप छान बनवत असे आज पण ती चव विसरता येत नाही ,"
हे आपल्या बायकोला कधी ना कधी बोलून दाखवत असतात .
अश्या वेळी कधी कधी थोडा राग येतो पण मनात आपण देखील मान्य करतोच ना .
आई ,आई असते .जेव्हा आपले मुले मोठी होतात तेव्हा ते पण कोणाला तरी हेच
बोलतात .मला ना फक्त आईचे जेवण आवडते .
अनेकदा केवळ रुची पालट म्हणून किवा एन्जॉय म्हणून आपण अनेकदा बाहेरचे खातो .
देखील .आपला म्हणजे अनेकांचे मत असे आहे कि बाहेरच्या पदार्थाला जास्त चव असते .
किती जरी बाहेरचे आवडली तरी नकळत घरचा डाळ भात बरा किवा आपली भाजी भाकरी

 बरी असेच म्हणतो आपण शेवटी .
आज लग्नाला एवढे वर्ष झाले तरी आज पण आठवतात .आईने केलेल्या भाज्या .
वांगी असो कारली नाहीतर गवार ,या भाज्या न आवडणारे अनेक असतात . 

पण माझी आई या खूप[ छान बनवत असे आणि आज पण त्या माझ्या आवडत्या भाज्या आहे .
मी किती प्रयत्न करते आई सारखे बनवण्याचे पण मला कधी ती चव आली आहे असे वाटतच नाही .

मग किती पण मसाले घाला नाही तर काही करा .
कमी साहित्य घालून आई भाज्या करत असे .कोड्याचा मांडा करणे म्हणतात तसे .
शेवटी काय आई हि आई असते .
४ मार्च  २०१५