आठवणीतील माणसं.
आजकाल रेडिमेड कपडे घेण्याची फॅशन जास्त आली आहे.टेलर्सची शिलाई परवडत नाही म्हणून अनेक जण रेडिमेड कपडे घेणे पसंत करतात.
आमच्या लहानपणी मात्र कपडे शिवूनच घेतले जायचे.रेडिमेड कपड्यांना 'आयतळे 'कपडे हा शब्द प्रयोग वापरला जायचा.आजच्या सारखे ते पर्फेक्ट मापाचे मिळत नव्हते.आठवडा बाजारात जास्त करून कापड दुकाने असायचे.रेडिमेड कपड्याचे दुकान कमी असायचे.
आजचे कॉटन म्हणजे तेव्हाचे मांजरपाट किंवा खळीचे कपड म्हणायचे.पॉलिस्टर महाग असल्यामुळे सगळयांना परवडत नव्हते.श्रीमंत असतील तेच पॉलिस्टर कापड घेत.आज उलट झाले आहे.कॉटन महाग झाले."वक्त वक्त की बात"
कापड घेतल्यावर ती शिवून घेण्यासाठी तेव्हाच्या भाषेत शिंपी शोधणे किंवा टेलर शोधणे सुरू व्हायचे.खरे तर गावात भरपूर टेलर्स होते.काही परंपरागत काम करणारे तर काही हा पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून करणारे.
असाच आमचा टेलर्स होता.बाळू नावाचा.
स्वभावाने अतिशय गरीब होता.राहायला तो मळ्यात राहायचा.गावाशेजारी त्यांचे शेत होते त्या शेतात त्यांचे घर होते.घरातील सगळ्यात मोठा मुलगा म्हणून घरातील बरीच जबाबदारी त्याच्या खांद्यावर होती.
गावातील एका मातीच्या घरात त्याची मशीन होती.दिवसभर तो त्यावर काम करीत बसायचा.इतर वेळी त्या घरा समोरून जाताना तिकडे न बघणारे आम्ही मात्र नवीन कापड घेतली की त्याच्या दारात हजर व्हायचो.खरे तर फॅशन म्हणजे काय कसा बरोबर खातात हे माहिती नसणारे आम्ही.....गावात गणपती मध्ये एखादा फुकट चित्रपट दाखवला की त्यातील नटी जसा ब्लाउज घालते (फुकट चित्रपट हे जास्त करून पौराणिक असायचे)म्हणून त्यात जास्त करून साडी नेसणारी नटी असायची.तिने घातलेल्या ब्लाउज सारखे अनेकजणी ब्लाउज शिवून घ्यायच्या.
आम्ही बाळू टेलर कडे जाऊन असेच वेगळे काही तर शिवून दे म्हणून मागे लागायचो.पंजाबी ड्रेसची फॅशन नव्हती.ज्याला आज गाऊन बोलतात तसे घेरदार मॅक्सी किंवा शर्ट आणि घेर असलेले लॉंग स्कर्ट(तेव्हा याला परकर पोलके म्हणत) शिवून घ्यायचो.
मंगळवारच्या बाजारात कापड घेतले की संध्याकाळी बाळू टेलरच्या दारात हजर व्हायचो.माप दिल्या पासून कधी देणार म्हणून सुरवात व्हायची.तो मोघम सांगायचा चार दिवसांनी या.चार दिवस कसातरी दम काढल्यावर पाचव्या दिवशी सकाळी त्याच्या दारात हजर व्हायचो.असे रोज म्हणून आठ दहा चक्कर मारल्यावर कुठे कपडे हातात मिळायचे.
बाळू एक माणूस आणि त्याच्या कडे खूप कपडे शिवायला येतात.एकाच मशीनवर काम करताना त्याला किती काम करावे लागते याची जाणीव नसल्यामुळे आम्ही कपडे उशिरा देतो म्हणून खूपदा बोललो आहे.तो मात्र नेहमी हसून देतो म्हणत राहायचा.
आज मुंबई सारख्या शहरात जेव्हा टेलर्स बघते तेव्हा बाळू आधी आठवतो.माप दिल्यावर असे शिवले तर तेवढे पैसे होतील बोलणारे.परवडत असेल तर शिवा ,हे बोलणारे.तेव्हा अनेकदा शिलाई न विचारता कपडे शिवल्यावर अनेक दिवस पैसे दिले नाही तर काही न बोलणारा बाळू आठवत राहतो.
अनेक वर्षे झाली बाळू सारखी अनेक माणसं भेटलीच नाही कधी तरी आठवणीतून ते बाहेर येत राहतात.कधी तरी ते आपल्या जगण्याचा एक भाग होते हे आठवत राहते.आज गाव बदलले मातीचे घरे गेली.गावचे साधेपणा त्या बरोबर हरवला.तरी गावात गेल्यावर मन कुठे तरी ओळखीच्या खुणा शोधत राहते.
No comments :
Post a Comment