Thursday, 6 January 2022

बांगड्या भरणे(लग्नातील एक रीत)

"फुटकी काच यांची कधी माहिती नाही?" हे वाक्य अनेकांनी आपल्या आई आजीच्या तोडून नक्की ऐकले असेल.सून माहेरी गेली की बांगडया भरून आली पाहिजे अशीच काही रीत होती.दिवाळीत तर हमखास लेकी आणि बहिणी बांगडया भरूनच जात

जशी साडी हा स्त्रीच्या जिव्हाळ्याचा विषय आहे तश्या बांगड्या हा देखील स्त्रीच्या आवडीचा विषय आहे.लग्नात मानपानाला फार महत्व असते.

जेव्हा घरात मुलाचे किंवा मुलींचे  लग्न असते.तेव्हा अनेक गोष्टी असतात त्यात बांगड्या भरणे हा एक सोहळा असतो(म्हणजे अलीकडे प्रमाण कमी झाले)खेड्यात अजून ही प्रथा आहे.

गावातील बांगड्या भरणारा कासार बोलावला जातो.मग तो आपल्या मोठया मोठया पिशवीतून बांगड्या घेऊन येतो.अनेक रंगांच्या ,अनेक डिझाईनच्या.सुंदर सुंदर बांगड्या.जावा,नंदा,मैत्रिणी शेजारी राहणाऱ्या महिला मग जमतात.जवळच्या त्या अगदी एक हातात दोन दोन डझन बांगडया घालून घेतात.मुद्दाम देखील घातल्या जातात.फुकट मिळतात म्हणून😂

काही फक्त मान म्हणून दोन दोन बांगड्या घालून घेतात.हा सोहळा जसा लग्न आधी होतो तसाच वधू माहेरी जाताना चुडा उतरवण्या वेळी होतो.नवरी आणि तिच्या करवल्या याना बांगड्या भरल्या जातात.

कधी काळी काचेच्या बांगड्या स्वस्त होत्या आता मात्र दीडशे पासून पाचशे पर्यंत डझन बांगड्या मिळतात.अलीकडे याचे बिल दहा हजराच्या पुढे जाते.म्हणून आता पूर्वी सारखा आग्रह केला जात नाही.अलीकडील मुली फार तर सहा बांगड्या पुढे बांगड्या घालत नाही.

पूर्वी जर बांगड्या साठी आग्रह केला नाही तर पुढील अनेक वर्ष  ऐकावे लागायचे."लग्नात लाख खर्च केला पण बांगडीची फुटकी काच नाही भरली"किती साधी माणसे आणि किती साधी अपेक्षा असायच्या ना??
अलीकडे लग्न म्हणजे इव्हेंट झाला.लग्न कमी आणि फोटो साठी केलेली प्रत्येक कृती जास्त वाटत असते.

आज आई कुठे काय करते या मालिकेत बांगड्या भरण्याचा एक सीन बघून आठवले.
असेच मनातले काही

मातेरे

मातेरे
 तू माझ्या आयुष्याचे मातेरे करून टाकले किंवा त्याने माझ्या आयुष्याचे पार मातेरे करून टाकले.हे वाक्य लहान असताना आजूबाजूच्या माणसा कडून खूपदा ऐकले आहे.खास करून महिला वर्गा कडून तर अनेकदा.

असे कोणी म्हटलं की मला लगेच आठवायचा तो मातेरा.काय असतो मातेरा.??शेतात जेव्हा कापणीला पीक यायचे तेव्हा ते कापताना काही कणसे खाली पडायचे.किंवा पाऊस आला पीक आडवे झाले तर हमखास त्याना माती लागायची.असे कणसे कुटल्यावर त्यात ती माती मिक्स व्हायची.धान्य कमी माती जास्त असे व्हायचे.

अनेकदा कापणी करताना मुळासह झाड उपटून यायचे त्याची माती मिक्स व्हायची.पूर्वी  कापणी करताना पडलेले कणसे देखील जमा करून आणायचे.एक धान्याचा कण वाया जाऊ द्यायचे नाही.म्हणून असे माती मिक्स झालेले धान्य त्याला मातेरा म्हणत.म्हणजे काय? चांगल्या धान्याची माती होणे.

शेतातील काम संपले की एखाद्या दिवशी नदीवर किंवा विहिरीवर हा मातेरा धुण्याचे काम चालायचे.माती मधील ते धान्य एका पातळ सुती कपड्यात जास्त करून फटके लुगडे यासाठी वापरले जायचे.त्या कपड्यात माती मधील धान्य टाकून दोन जणी ते झोळी दोन बाजूने पकडून पाण्यात बुडवायच्या पाण्यामुळे माती पाण्यात विरघळून जायची.असे खूपदा केले की माती पूर्ण निघून जायची आणि स्वच्छ धान्य खाली राहायचे.

मातेरा हा काही दर वर्षी निघत असे नाही.एखाद्या वर्षी जास्त असायचा मग तो धुण्याचा कार्यक्रम असायचा.आता कोणी  अश्या धान्य कडे बघणार नाही.जसे काही शब्द आता कालबाह्य झाले तसेच मातेरा कधीचा काल बाह्य झाला आहे.

जेव्हा कधी असे काही आठवते तेव्हा पूर्वीच्या महिला कशात स्वताला गुंतवून ठेवायच्या हे आठवते.चार दोन महिला एकत्र यायच्या मनापासून काम करायच्या एकत्र वेळ घालवायच्या.म्हणून त्यांच्या तोंडातून कधी बोर होते हे कधी बाहेर पडायचे नाही.

असेच आठवणीतील काही बाही.

हौद

हौद 
खरे तर शहरात आता बघायला न मिळणारा...
खेड्यात कालबाह्य होत जाणारा....हौद

शेतकरी आणि बैल एक अतूट नाते होते.जेव्हा शेती हाच व्यवसाय होता.अगदी जेव्हा विहिरीवर मोटा चालायच्या तेव्हा प्रत्येक विहिरीवर एक हौद असायचा.तेव्हा तो दगडाने बांधलेला आणि चुना घालून पक्का केलेला असायचा.मोट वर आल्यावर आधी त्यात उपडी व्हायची नंतर त्याच हौदातून दंड पाडून पाणी शेतीला पाठवले जायचे.

दिवसभर माणसांना आणि शेतात राबणाऱ्या बैला साठी त्या हौदात पाणी असायचे.काळ बदलला आणि विहिरीवर विजेवर चालणारी मोटर (पंप)बसवले जाऊ लागले.पंप चालू झाल्यावर दिवसभराचे पाणी काही तासात उपसले जाऊ लागले.विहिरीतून पाणी बाहेर टाकणारा पंप व्यवस्थित राहावा म्हणून आणि पाण्याचा वेग रोखला जावा म्हणून हौद बांधला जाऊ लागला. जो पूर्णतः विटा आणि सिमेंटचा पक्का बांधलेला असे.पंप बंद झाला तरी त्यात भरपूर पाणी राहायचे.

एकदा पंप चालू झाल्यावर विहिरी मधील स्वच्छ पाण्याने भरून तो वाहायला लागला की भारी वाटायचा.जर एखाद्याची विहीर गावा शेजारी असेल तर त्यावर सकाळी सकाळी बाई माणसांची गर्दी व्हायची कोणाला पाणी न्यायचे असायचे तर कोणाला धुनी धुवायची असायची.लहान मुलांना त्यात डुबायला आवडायचे.विहिरीतील त्या स्वच्छ आणि थंडगार पाण्याचा स्पर्श खूप वेगळाच असायचा.

त्या हौदाने रोज अशी माणसांची किलबिल ऐकलेली असायची.मुलांचा आरडाओरडा ऐकलेला असायचा.कोणा सासुरवाशीणचे हुंदके ऐकलेले असायचे.तिच्या डोळ्यातील पाणी स्वता मधून सामावून ते प्रवाहित केले असायचे.तहानेने व्याकुळ झालेल्या गाई बैलांची तहान भागवली असायची.त्यांच्या गळ्यातील घुंगराचा आवाज ऐकलेला असायचा.कोणच्या तरी एकटेपणात त्याच्यात पाय सोडून बसलेल्या व्यक्तीच्या पायाला आपल्या स्पर्शने साथ दिलेली असायची.

भरलेला हौद त्यातून वाहणारे पाणी ...ते खाली दंडात पडताना होणारा त्याचा आवाज....उगाच त्यात हात घालून त्या पाण्याशी केलेला चाळा...आजूबाजूला डोलणारी पिके.सगळे कसे उल्हसित करणारे.

गाव सोडले शहरे जवळ केली.मनातून जात नाही ते गाव.
मग उगाच कुठे तरी मुलांना घेऊन रिसॉर्ट वर जायचे.क्लोरीन घातलेल्या आणि साठवून ठेवलेल्या त्या पाण्यात उड्या मारायच्या.मुला कडे बघून  खुश व्हायचे.मनाने मात्र आज स्वताचे अस्तित्व नसलेल्या त्या विहिरीवर त्या हौदा पाशी जाऊन यायचे.खिशात पाच पैसे नसताना केलेली ती मजा आठवायची.पुन्हा आपल्या कामाला लागायचे.

आजही शेतात तो हौदा आहे.पाणी नसलेली विहीर आहे.शेत करायला कोणी नाही म्हणून ओसाड पडून आहे.आता   ठिबकद्वारे पाणी शेताला दिले जाते.विहिरी ऐवजी बोरवेल घेतले जातात.

काळ बदलला आहे,बदलत आहे.कुठला तरी एखादा हौद गत काळाची आठवण मात्र देत असतो.
असेच मनातले काही.

असा सांता हरवलेलाच बरा,!

आज सोशल मीडिया वर एक पोस्ट अनेकदा समोर आली ती म्हणजे .
"आमचा हरवलेला सांता"
या मध्ये वासुदेवाला उद्देशून लिहिले आहे.जो आता दिसत नाही।कारण त्याची ओळख आम्ही आमच्या पिढीला करून दिली नाही.

मला तर आता वासुदेव दिसत नाहीत म्हणून उलट बरे वाटते.कारण सकाळी सकाळी वासुदेवाचे रूप घेऊन फिरणारा तो समाज आता काळानुसार बदलला आहे बदलत आहे.याचा आनंद वाटतो आहे.

खेड्यातील असल्यामुळे डोंबारी,नंदीबैल वाले,व्हरडी आईचे खोके डोक्यावर घेऊन जाणारे,स्वतःच्या अंगावर सोटा मारून घेणारे खुप जवळून बघितले आहे.आज या गावात मग त्या गावात फिरत राहायचे.ज्या गावात जाणार त्या गावातील मोकळी जागा बघून त्यावर आपली पाल ठोकायची.त्या गावात आणि आजूबाजूच्या गावा मध्ये फिरायचे.जे मिळणार ते घेऊन यायचे.

ती पण माणसेच आहे त्यांना पण इच्छा,अपेक्षा आहे याचा कोणी विचार करत नव्हते.स्वतंत्र मिळून त्याना आपल्या सविधान नुसार शिक्षणाचा अधिकार मिळाला.त्या समाजातील मुले आज शिकत आहेत कुठे तरी स्थिर होत आहेत.त्यांना जाणीव झाली आहे आपल्या हक्काची अधिकाराची.

वासुदेव आता हरवला म्हणणारे लोक येथे लिहिताना हे विसरतात की जेव्हा वासुदेव येतो तेव्हा त्याला आपल्या सोसायटी मध्ये घुसू न देणारा एक वर्ग आहे.

उलट आज ते दिसत नाहीत म्हणजे त्यांनी प्रगती केली हे नक्की.समजा नसेल केली तरी त्यांनी आपले जगण्याचे साधन नक्की बदलले आहे हे मात्र खरे आहे.किती दिवस तो वेष करून त्यांनी लोकांच्या दारा समोर उभे राहायचे.चार दोन रुपये किंवा पसा भर धान्य कोणी देईल याची वाट वघायची.

माझ्या लग्न आधी एक वासुदेव दुसऱ्या गावावरून यायचा.बाजार असायचा त्यादिवशी तो गावात यायचा.आमच्या घरी यायचा बरोबर आणलेली भाकर तुकडा सोडून खायचा.कधी स्वयंपाक झाला असेल तर आई त्याला जेवायला द्यायची.मग आपल्या पोतडी मधून तो सामान काढून वासुदेवचे कापडे घालायचा.काखेत झोळी अडकवून तो गाणे म्हणत चालायचा.त्याचे पायातील ते कडे छम छम वाजायचे.डोक्यावर मोराच्या पंखाची टोपी घालून कपाळावर टिळा लावून गाणे म्हणत म्हणत तो गोल गोल फिरायचा.लहान असल्यामुळे त्यात गंमत वाटायची.परत जाताना कधी कधी तो उदास दिसायचा पण तेव्हा ते समजायचे नाही.त्याला त्या दिवशी धान्य केव्हा पैसे कमी मिळायचे.

आई वडील शेतात राहायला गेले.माझे लग्न झाले आणि या सगळ्याचा विसर पडला.मागे चार पाच वर्षांपूर्वी अचानक एका ठिकाणी तो भेटला.लगेच ओळखले त्याने ,जवळ आला चौकशी केली.त्यांना विचारले अजून येता तुम्ही वासुदेव बनून.
त्यावर तो बोलला नाही ताईसाहेब आता मुले मोठी झाली शिकली कामाला लागली आता नाही मी फिरत.त्यांच्या साठी कष्ट घेतले ते कामाला आले अजून काय पाहिजे.

पसाभर धान्य आणि काही पैसा साठी फिरणारा त्याच्या घरातील तो शेवटचा होता बघून खूप बरे वाटले होते.असा सांता हरवलेला कधी चागले.राहिले नाताळ वेळी येणाऱ्या सांता बद्दल.ते एक काल्पनिक पात्र आहे.ते कोणा कडे  मागायला जात नाही.ते असेल ते दुसऱ्यांना देऊन आनंद वाटत असतो.त्याच्या बरोबर कधी वासुदेवाची तुलना होऊ शकत नाही.जे करतात त्याना अजून तो समाज आहे तसाच रहावा असे वाटते का?असा प्रश्न नक्की पडतो.
असेच मनातले काही.
फोटो गुगल सर्च