Thursday, 29 July 2021

कोणाशी तरी बोला

कोणाच्या तरी आत्महत्याची बातमी येते आणि मन उदास होऊन जाते.निराशा हतबलता काहीच न सुचने .आपला कोणाला उपयोग नाही आपल्या साठी कोणी नाही ही भावना इतकी तीव्र असते की .जगाचा विसर पडतो जगात फक्त आपण खूप दुखी आहे ही एकच भावना प्रबळ होते आणि टोकाचे पाऊल उचलले जाते.
एखादी व्यक्ती आत्महत्या करते त्यानंतर अनेक बोलतात.आत्महत्या हा का उपाय आहे का ? आत्महत्या कमजोर लोक करतात.कोणा जवळ बोलावे मन मोकळे करावे.
काय गंमत आहे ना मन मोकळे करावे बोलणारे लोक जर मनातले बोललो तर बोलतात काय रडगाणे चालू असते नेहमी .किती जण आहे असे कोणी दुःखात असेल तर समजून घेतात.आज एक ग्रुप मधील नेहमी पोस्ट मधून भेटणारा एक असाच जग सोडून गेला .मनात प्रचंड घालमेल घेऊन गेला असेल.
कोणी तरी आत्महत्या केली की मला माझे नैराश्याचे दिवस आठवतात.कमी वयात झालेला संधिवात त्यामुळे कोणती काम न करता येणे.याचे होणारे प्रचंड दुःख.आपला जगून काय फायदा असे टोकाचे विचार कधी काळी मनात येत .कोणाला सांगणार मग माझ्या सुरवातीच्या अनेक पोस्ट असाच असायच्या .निराशेने भरलेल्या .मी कधी काळी आत्महत्ये वर अनेक पोस्ट लिहिल्या .मृत्यू म्हणजे सगळ्या मधून सुटका असे मला वाटायचे.मनातली घालमेल माझा पोस्ट मधून बाहेर पडत असे.पण मला नाही आठवत मला कोणी विचारले तुला काही त्रास आहे का?
उलट मला नावे ठेवणारी भेटली .काय बघावे तेव्हा रडगाणे गाते.किती निगेटिव्ह लिहिते.पण असे का?
हे कधी कोणी नाही विचारले.कधी तरी कोणाला सांगून बघितले आपले समजून त्यांनी काय केले .स्वताचे कर्तव्य असल्या सारखे दुसर्यांना सांगून माझा मजाक उडवला .माझा बद्दल जेवढे बोलता येईन तेवढे बोलून घेतले.
कोणी आत्महत्या करते तेव्हा येणाऱ्या कॉमेंट असतात कोणाशी बोलायला पाहिजे होते.पण तो कोण भेटत नाही आणि एक जीव प्रचंड निराशेने जातो.
गरज असते स्वताच सावरण्याची ,काही तरी जगण्याचे कारण शोधण्याची ...
मग कळते आयुष्य समजतो तेवढे वाईट नसते.
असेच मनातले काही

Sunday, 25 July 2021

विज्ञान शाप की वरदान

शाळेत असताना नेहमी एक विषय निबंधा साठी असायचा "विज्ञान शाप की वरदान"त्यावेळी दहा मार्क्स मिळणार म्हणून निबंधाच्या पुस्तकातून पाठ करून पेपरात लिहिला जायचे.त्यावेळी मनात विचार देखील कधी आला नाही.पुढे जाऊन खरच येणारे नाविन तंत्रज्ञान वरदाना बरोबर शाप ठरेल.माणसांना माणसा पासून दूर घेऊन जाईन.

पर्यावरणात जसा बदल होत चालला तसे जगणे अवघड होतं चालले आहे.कधी काळी नदया नाले भरून वाहत असायचे तिथे आज पिण्यास पाणी नाही.शांत असणारी गावे आज आधुनिकतेचे वारे लागल्या मुळे आता गावचा शांत पणा हरवून बसले आहेत.गावाकडील लोकांना शहरी वातावरण मोहावत आहे.प्रत्येकला आज सुख सुविधा हव्या आहेत.कोणाला चालणे आता नको आहे.त्याचा परिणाम दरवर्षी वाढणारी वाहने त्यामुळे होणारी रहदारी.त्यामुळे कामाच्या ठिकाणी होणारा उशीर,कर्कश हॉर्न यामुळे होणारी चिडचिड.नको तिथे निघणार राग.यातून माणसं मानसिक आजरा मुळे त्रस्त आहेत.कुठे तरी तो आपले पणा शोधत असताना दिसत आहे.

आपल्या कडे आहे त्यात समाधान मानण्या पेक्षा त्याला दुसऱ्या कडे जे आहे ते आपल्या कडे हवे आहे.यातून कोणी सुटत नाही.माणसांना भुलवणारे तंत्रज्ञान आले.आधी आला टीव्ही ....
एकमेकांशी गप्पा मारणारे एकमेकांना कडे जाणारे लोक मग स्वतःच्या घरात तासनी तास टीव्ही बघत बसू लागली.घराच्या दारा बरोबर मनाची दारे बंद करून बसू लागले.समोर दिसते त्याला खरे समजून तसे जगण्याचा प्रयत्न करायला लागले.

त्या नंतर आलेल्या मोबाईल मुळे तर माणसे अजून एकटी होत चालली.चोवीस तास मोबाईल हातात त्यात असणारे इंटरनेट त्यात असणारे अनेक ऍप ,एक क्लिक वर मिळणारी माहिती.त्यात मोठी भर म्हणजे सोशल नेटवर्किंग साईट.

आधी एखादी गोष्ट माहिती नसेल तर कोणाला तरी विचारण्या शिवाय पर्याय नसायचा.नाही तर पुस्तकात शोधायला लागायचे.म्हणजे काय कोणाशी तरी सवांद साधायला लागत असे.पण आता त्याची कोणाला गरज वाटत नाही.अगदी एका घरात राहत असून एकमेकांना काही विचारावे वाटत नाही.पण दूर वर राहणाऱ्या लोका बरोबर तरी बोलत असतात.सवांद तर हवा पण आपल्या माणसा बरोबर नाही.यातून काय होत आहे माणूस सारखा मोबाईल मध्ये गुंतून राहत आहे.

हळूहळू अनेकजण मोबाईल अडीक्ट होत चालले आहे.हे अनेकांच्या लक्षातच येत नाही.कोणाला फेसबुक हवे तर कोणाला गुगल ....

यामुळे अनेकदा आपल्या आजूबाजूला काय चालू आहे याचा विचारच नाही.पण याचा त्रास मात्र आपल्या जवळील लोकांना होतो.आपल्याला घरातील माणसा वर लक्ष ठेवायला हवे.आपल्याच घरातील सदस्य मोबाईल ऍडिंक्ट तर होत नाही ना ?यावर लक्ष ठेवायला हवे.जेणे करून आपण त्यातून त्यांना वेळीच सावरू शकू.
असेच मनातले काही

माणसांची ओळख

आयुष्यात नेहमी नवीन लोक भेटत राहतात.जेव्हा नवीन ओळख असते तेव्हा असा अनेक गोष्टी असतात ज्या आपल्याला इम्प्रेस करतात.स्वभाव आवडतो कधी नवीन व्यक्तीचे काम आवडते.नकळत मग मैत्री होत जाते.

खरी व्यक्तीची ओळख त्यानंतर होते.हळूहळू स्वभावातील अनेक बारीक बारीक गोष्टी समजायला लागतात.मग कधी त्या पटणाऱ्या असतात कधी न पटणाऱ्या असतात.

या ओळखी मधून व्यक्ती कधी कोणत्या प्रकारे रिऍक्ट होईल.कोणत्या गोष्टीवर कोणती रिऍक्शन येईन हे समजायला लागते.त्याच बरोबर व्यक्ती जे बोलते ते किती खरे किती खोटे आणि किती स्वतःच्या मनाने रचून सांगतात हे लगेच ओळखता येते.त्याचा परिणाम असा होतो की सुरवातीला ज्या गोष्टी बद्दल आपल्या आश्चर्य वाटत असते किंवा कौंतुक वाटत असते ते नंतर ते वाटत नाही.उलट काय खोटे बोलतात किंवा काय थापा मारतात अशी आपली रिऍक्शन असते.

कदाचित कोणत्या गोष्टी बद्दल नवल वाटणे तिचे कौतुक वाटते ते तो पर्यंत त्या बद्दल जास्त माहिती नसते.एकदा का माहिती झाली की त्यातील नवल,कौतुक संपून जाते.
असेच मनातले काही

आपण कसे आहोत

आपण कसे आहोत, हे आपल्याला भेटणारी माणसे त्यांना आलेल्या अनुभवा वरून ठरवत असतात.पण खरे आपण कसे हे आपल्यालाच माहिती असते.फक्त शातपणे स्वताच स्वताला हा प्रश्न विचारून बघावा.आपण आपल्यालाच जज करू शकतो का?बिलकुल नाही आपण स्वतःला आपण वाईट कधीच समजत नाही.

आपले आपले स्वतःचे सु:खाचे आणि दुःखाचे वर्तुळ असते.त्यात आपण आपल्या सोयी नुसार लोकांना सामील करत असतो.शक्यतो सुखात सामील करताना ते न सांगता दिसते समजते.या उलट आपल्या स्वतःच्या वेदना आणि दुःख असते ज्यात आपण कोणाला सामील करायचे हे आपण ठरवतो.आपले दुःख कोणाला दिसुच नाही असाच प्रयत्न करतो.एक मुखवटा लावून जगत असतो.

आपल्या वरवर हसून राहण्या वरून लोक आपल्याला सुखी समजतात.किंवा आपण चागले,वाईट हे ठरवतात.

खरे तर कोणच्या जवळ गेल्यावर हळूहळू व्यक्ती नकळत समजत जाते.तिच्या बद्दलची मते देखील.मग अचानक चांगली आदर्श वाटणारी व्यक्ती अचानक अनादर करावी एवढी वाईट ठरते.तर काही वरवर कठोर  भांडखोर वाटणारी लोक मनात प्रचंड दुःख दाबून जगताना बघून त्यांच्या बद्दल प्रचंड आदर वाटू लागतो.माणसे तीच असतात बदलते ती आपली त्यांच्या कडे बघण्याची नजर आणि दृष्टीकोन....
असेच मनातले काही

बदलती माणसे

आज गावे बदलली,गावांचे शहरीकरण झाले असे आपण बोलतो.आपण जिथे बालपण घालवले ते गाव बदलले बघून वाईट वाटते.मनाला वेदना होतात.नकळत मन भरून येते.त्याच वेळी आठवतात आपले आई वडील आणि आजूबाजूची त्यांच्या सारखी जुनी माणसे.मग वाटते आपण त्यांना खुप सहज बोलतो "तुमचा जमाना गेला"तेव्हा वेगाने बदलणारे हे जग बघून आपल्याला किती वेदना होतात त्याच्या हजार पट वेदना त्यांना होत असतील.

दोन तीन दिवसा पूर्वी एक आज्जी भेटल्या 80 वर्ष वय निरक्षर.आज ही स्वतःचे काम स्वता करतात.अगदी स्वतःचे जेवण स्वताच बनवतात.घरात सून असून देखील.आज्जी तुम्हाला पेन्शन असून तुम्ही का अजून काम करतात असे विचारले वर खूप सहज पणे बोलल्या ती पेन्शन कुठे माझ्या वाट्याला येते.म्हणजे त्यांना त्यांच्या पतीची पेन्शन भेटली ती घरात खर्च होते.खूप थोडे बोलल्या त्या पण जाताना दोन तीनदा संगीतले माझी सून भेटली तर बोलू नका मी काही बोलले.खरे तर मुंबईत घराचा नंबर माहिती असल्या शिवाय कुठे जात येत नाही.अश्या या शहरात कुठे मला त्यांची सून भेटणार होती.

आज्जी का घाबरतात एवढया यावर त्यांचे उत्तर होते,घाबरण्यात जन्म गेला.आधी सासुरवास काढला.सासूचे शेवट पर्यंत केले.आज जमाना एवढा बदलला आहे आज सुनेचे करायला लागते आहे.आमच्या वेळी नव्हते बाई असे.
या वाक्यात खूप काही वेदना असतात.

आज्जी निघून गेल्यावर खूप वेळ मनात विचार येत राहिले.लग्न झाले की सासरी गेल्यावर सासर हे आपले घर समजून आता येथेच आपला शेवट समजून आहे तसे जगत राहायचे.मग सासरी किती छळ झाला तरी तो सहन करायचा.घरातील मोठ्या माणसांना जीव लावायचा.त्यांचा आदर करायचा.मुलगा झाला की खुश व्हायचे.उद्या तो आपल्याला सांभाळणार म्हणून ......
पण गेल्या काही वर्षात वेगाने होणारे बदल यामुळे सगळेच बदलले.मोठ्यांचा आदर तर दूरच ते घरात नको झाले.मग ही मधली पिढी यात भरडली गेली.त्यांना बघून मनात येते त्यांचा काळ आणि आता होणारा बदल यामध्ये त्यांच्या मनाला किती वेदना होत असतील ना.?
परिवर्तन जरुरी आहे,पण ते होताना खूप काही बदलते.त्याला समोर जाताना मागचे खूप काही सुटत जाते.
असेच मनातले काही.
आशा नवले

Thursday, 22 July 2021

माफ करावे

सकाळी उठल्यापासून झोपे पर्यंत अनेक लोक आपल्या संपर्कात येत असतात.काही आपलीच असतात तर काही नवीन भेटत असतात.कधी आपण चुकतो कधी समोरचा.चुके मुळे कधी कधी आपल्याला त्रास होतो कधी समोरच्यानं.....
आपली चूक असेल तर सरळ माफी मागतो.अर्थात आपल्या माफी मगण्यामुळे समोरच्याला झालेला त्रास कमी होणार नसतो.परंतु आपल्याला मनाला लागणारी बोच तरी कमी होते.

हेच कधी कधी समोरच्याकडून घडते.कोणी माफी मागतात कोणी नाही.आपले जर नुकसान जास्त असेल तर आपण माफी मागितली की माफ करूनही टाकतो.पण जे लोक माफी मागत नाही त्यांच्या बद्दल मनात राग राहून जातो.म्हणतात ना"माणूस आनंदाचे क्षण विसरतो पण कोणी केलेला अपमान किंवा नुकसान विसरत नाही"

काही लोकांचे काही बिघडवलेले नसते तरी सहज ती लोक येता जाता अपमान करतात.टोकाचे मन दुखेल असे बोलतात.आपल्याला काळातच नाही आपण त्यांचे काय बिघडवले.आधी आधी आपण रिऍक्ट करतो.त्याचा त्रास आपल्याला होतो.नंतर आपल्याला सवय होते.आपण इग्नोर करतो.पण जेव्हा आपल्याला राग येतो तेव्हा आपल्या तोंडातून रागाने अपशब्द बददुवा निघून जातात.खरे तर आपल्यालाच ते पटत नाही रागात निघून जातात.त्या व्यक्तीचे काही वाईट होते की नाही माहिती नाही पण बोलतात आपलेच शब्द कधी कधी आपल्याला लागतात.जर तुम्ही संवेदनशील असाल तर आपण असे कसे बोललो याचा त्रास होतोच होतो.

अनेकदा आपण मनात कोणता स्वार्थी न ठेवता मदत करतो.काम झाला की ती व्यक्ती आपल्याला विसरून जाते.मग ती कधी जवळची असते कधी दूरची.जवळची असेल तर ती रोज आपल्या समोर असेल तर त्रास होतो.मग किती त्रास करून घ्यायचा नाही म्हटलं तरी.याउलट दूरच्या लोकांना आपण सहज मनातून काढू टाकू शकतो.

आता अश्या लोकांना आपण एक नाकरात्मक विचार घेऊन आठवणीत ठेवतो.त्याना माफ करू शकत नाही.

माफ करता यायला हवे  ...मागची पाटी पुसून नाविन लिहिता आले पाहिजे.हे जमायला हवे.मग त्या व्यक्तीशी संबंध ठेवायचा नसेल तरीही.मी अतिशय संवेदनशील आहे.पण मला माफ करणे जमत नव्हते अजून पण तेवढे जमत नाही.सरळ त्या लोकांना आयुष्यातून वजा करून मी पुढे जाते.

माझ्या वडीला आणि माझ्या मध्ये खूप चांगली बॉडिंग होती.टोकाचे धार्मिक होते ते.उठता बसता पांडुरंग पांडुरंग चालू असे.कधी कोणाला वाईट शब्द बोलताना बघितले नाही.कायम धार्मिक गोष्टी सांगत राहायचे त्यातून अनेक दाखले द्यायचे.

कोणी किती अपमान केला वाईट बोलले तरी काही बोलत नसत.यावर त्याना विचारले तर बोलत पांडुरंग घेईल बघून.त्यांचे आणि माझे नाते काय? नाते आहे ते या देहाशी.देह संपला की संपले सगळे.प्रत्येक जण काही निमित्तानेच आयुष्यात येतो.वाटायचे त्यांची आई ते दोन वर्षाचे असताना गेली होती म्हणून याना ऐकून घेण्याची सवय लागली असावी.2014 मध्ये ते गेले.

मागच्या वर्षी कोविड आला एक एक जवळची माणसे गेली आयुष्याची क्षण भंगुरता जाणवली.देह संपला सगळे संपले राग लोभ.मग  ठरवले ज्यांचे मन दुखावले गेले असेल त्यांची देवा कडे माफी मागितली.ज्यांनी माझे मन दुखावले त्याना माफ करून टाक म्हणून  देवाला पार्थना केली.सगळ्यांना समोर जाऊन तर माफी नाही मागू शकत ना???कारण आपण मनापासून मागू पण त्यांनी करायला हवे ना?कधी कधी उलट अजून वाईट दोन शब्द ऐकायला लागू शकतात.
असेच मनातले काही