Sunday, 24 May 2020

आठवणीतील चित्रपट

फोटो गुुुगल सर्च


केबल घराघरात पोहचले नव्हते त्या आधीची पिढी ज्यांनी अनेक चित्रपट हे गणपती किंवा नवरात्र उत्सवात पडदयावर बघितले आहेत.

थिएटर हे फक्त मोठ्या शहरात असत.खेड्यागावा मध्ये एक तर चित्रपट हे कनाती मध्ये किंवा उत्सवातच बघितले जात.मी चार पाच वर्षांची असेन तेव्हा अनेक चित्रपट हे धार्मिक असत.मग संत सखू,संत तुकाराम किंवा ऐतिहासिक असायचे.नेताजी पालकर,थोरतांची कामळा.अश्याच प्रकारचे चित्रपट दाखवले जायचे.ते पण तेव्हा खूप भारी वाटायचे.

आमच्या गावात संत परंपरा मोडून पहिल्यांदा वहिनीच्या बांगड्या, सुशीला ,जगाच्या पाठीवर असे चित्रपट दाखवले गेले.चित्रपट दाखवण्याच्या आधी महिनाभर भोंगा लावून जाहिरात केली जायची.हे चित्रपट बघायला बाजूच्या गावातील लोक बैलगाडी भरून येत.चित्रपट बघताना मात्र त्यावेळची ती साधी माणसे रडायची.विसरून जायचे आपण बघतो ते सगळे खरे नाही म्हणून.

हळूहळू बदल होत गेला गणपती आणि नवरात्री उत्सव साजरे करणारे कार्यकर्ते बदलले.आमच्या गावात मग पहिला हिंदी चित्रपट आला भाई भाई.अमिताभ बच्चन याचा गरम मसाला.फक्त बच्चनचा चित्रपट म्हणून प्रचंड गर्दी झाली होती.शोले गाजलेला चित्रपट मात्र आमच्या गावात कधीच दाखवला गेला नाही.त्याचे बजेट कदाचित जास्त असावे.

गावात थिएटर नव्हते तरी अनेक चित्रपट पडद्यावर बघायला मिळाले आणि ते त्यावेळी एवढे आवडले की आज त्याची आठवण मनात ताजी आहे.राज कपूर याचा चोरी चोरी,श्री 420,बॉबी,प्रेमरोग,हाथी मेरा साथी,जंजिर ,दिवार,डॉन असे अनेक  हिंदी चित्रपट बघितले.

गंमत जंमत ,अशी ही बनवाबनवी,आणि अशोक सराफ ,लक्ष्याचे सगळे चित्रपट अश्याच पडद्यावर बघितले आहे.सीमा देव ,जयश्री गडकरी,रंजना ,सुलोचना आम्ही जातो आमच्या गावा मध्ये काम केलेली ,नाव आठवत नाही पण या सगळ्या तेव्हा प्रचंड आवडत होत्या.

मनात खोलवर त्या वयात कायमचा घर करून बसलेला चित्रपट वारणेचा वाघ,आणि सुशील.रंजना यांनी सुशीला मध्ये अफलातून अभिनय केला आहे.एक शिक्षिका ते तिकीट ब्लॅक करणारी पर्यतच प्रवास बघताना मनाला व्यथित करून जातो.

आज असेच अनेक त्यावेळी बघितलेले हे चित्रपट पुन्हा आठवले.हे चित्रपट सहसा पुन्हा टीव्ही वर दिसत नाहीत.काही वर्षांपूर्वी टीव्ही वर ऊन पाऊस नावाचा चित्रपट बघितला होता.नंतर तो इंटरनेटवर खूप शोधला पण नाही मिळाला.

आज असेच पडद्यावर मोफत बघितलेल्या चित्रपटाच्या आठवणी.

Sunday, 23 February 2020

शब्द

शब्दा विना अपुरे भाव मनीचे .......
मनातले कोणते भाव सांगण्यासाठी गरज असते ती शब्दाची ....
कोणत्या प्रसंगी आपण कसे शब्द वापरतो त्यावर बरेच काही अवलंबून  असते .बोलताना आपण कसे बोलतो .समोरील व्यक्ती साठी कोणत्या शब्दाचा वापर करतो यावर आपण त्या व्यक्तीला आपलेसे करतो .अहो जाहो किती छोटे शब्द आहे ना ? तसेच अरे तुरे हे पण छोटे शब्द आहेत .पण ते आपण कोणासाठी आणि कसे वापरतो यावर खूप काही अवलंबून असते .एखाद्या नावलौकिक असणाऱ्या व्यक्ती साठी आपण अरे तुरे बोलू शकत नाही .जर बोललो तर तो त्याच्या अपमान होतो .मग तुम्ही किती चांगले असा .ती व्यक्ती मग तुमच्यावर रागवेल .याउलट साध्या भाजीवाली महिला अथवा पुरुष असेल आणि त्याला जर आपण मावशी आथवा काका म्हणून बोललो तर त्याना दिलेला तो आदर होवू शकतो .कारण ती असते शब्दाची जादू .

एक छोटेसे उदाहरण ,एक व्यक्ती आपल्या मित्राला भेटायला त्याच्या घरी जाते .त्या मित्राचा मुलगा अंगणात खेळत असतो .हा मित्र त्याला सरळ न विचारता बोलतो ,काय रे ? तुझ्या आईचा नवरा घरात आहे का ?
त्यावर तो मुलगा त्याला काही उत्तर देत नाही .त्याच्या कडे रागाने बघतो .मग पुन्हा तो त्या मुलाला तो विचारतो .
बाळ ,तुझे बाबा घरात आहेत का ?
हे ऐकून तो मुलगा त्याचे बाबा घरातच आहे हे सांगतो .
दोन्ही वाक्यात प्रश्न एकाच आहे पण त्या मध्ये वापरले गेलेले शब्द हे वेगळे आहे म्हणून त्याचा परिणाम वेगळा होतो .
बोलतात ना शब्द माणसाला दहा मध्ये बसवतात ,तेच शब्द दहातून उठवतात .
दारुड्याच्या शब्दाला किमत नसते .पण एखाद्या आदरणीय व्यक्तीच्या शब्दाला खूप किमत असते .

Saturday, 22 February 2020

भाषा आणि वाणी

माणसे जोडण्याचे सगळ्यात प्रभावी साधन म्हणजे भाषा .आणि वाणी ........
अनेकदा व्यक्ती चांगली असते .त्याचे व्यक्तिमत्व देखील चांगले असते .तो चारचौघात उठून दिसणारा देखाणा/देखणी असते .बघता क्षणी लोकांना आवडणारे .आणि  काही काळ आवडतात देखील .पण जर भाषा चांगली नसेल तर ,काही काळात लोक कंटाळतात .कारण त्यांच्या व्यक्तीमत्वला विसंगत त्यांची भाषा असते .शब्द जोडतात शब्द तोडतात .
मितभाषी असणे चांगले पण .स्वस्तुती करणारे असतील तर त्यांची मितभाषां पण नको वाटते .मितभाषी असणे आणि वाचाळ असणे यात पण फरक असतो .अति बडबड करणारे पण लोकांना नको होतात .

याउलट आम्ही रोखठोक आहे म्हणून  कठोर भाषाचा वापर करणारे ,दुसऱ्याने लागेल असी भाषा वापरणारे देखील लोकांना नको वाटतात .
माणसांनी माणसात राहण्या साठी त्यांच्या बरोबर सवांद साधताना त्यांना जोडताना .नेहमी  समोरची व्यक्ती कशी आहे बघून सवांद साधला तर आपण कोणत्या व्यक्ती बरोबर जोडले जाऊ शकतो .खेड्यातील व्यक्ती बरोबर त्याच्या पातळीवर जावून बोललो तर सवांद होवू शकतो पण जर त्याच्या बरोबर आपण शेअर मार्केट बद्दल बोलायला गेलो तर आपण त्याच्या बरोबर बोलू शकू का ? अर्थात नाही .एखाद्या स्री ला घर आणि स्वयपाक याबद्दल जास्त आवड आहे माहिती आहे तिला नोकरी करताना काय समस्या येतात हे माहिती नसतात .म्हणून जर तू घरात बसते तुला काही कळत नाही असे म्हटले तर हा तिचा अपमान होणार आणि तिच्या बरोबर सवांद होणे शक्य नाही .

म्हणून खरी गरज आहे तुम्ही कुठे आहात .कोणत्या क्षेत्रातील अथवा कोणत्या वयोगटातील लोका बरोबर बोलता यावरून तुम्ही समोरील व्यक्ती बरोबर कसे वागायचे हे जर ठरवले तर तुम्ही अनेक माणसे जोडू शकतात .तुम्ही खूप चांगले असून उपयोग नाही हे सगळे जमले तर लोक देखील तुम्हाला चांगले म्हणतील .

अर्थात कोण चांगले कोण वाईट हे ठरवणे प्रत्येक व्यक्ती सापेक्ष असते .एकाला चांगली वाटणारी व्यक्ती दुसऱ्यांना चांगली वाटेलच असे नाही .
असेच मनातले काही .
22 फेब्रुवारी 2017

Thursday, 13 February 2020

पूर्वीच्या काळी एकत्र कुटुंब पद्धती होती.प्रामाणिक पणे वागणारी लोक होते.दिलेला शब्द पाळत होते.येण्या जाण्याची वेगवान वाहने नव्हती.त्यामुळे अनेकदा काही कोसाच्या अंतरावर सगळे नातेवाईक असायचे.

लग्न जमवताना अनेकदा वयस्कर माणसे पुढाकार घ्यायचे.तेच लग्न ठरवायची.मुलाने मुलीने पसंतीचा प्रश्नच नसायचा.यात बघितले जायचे ते घर आणि घरातील माणसे.ज्यांना नातेवाईक कमी आहेत गरीब आहेत अश्या लोकांची लग्न गावातील शहाणे लोक एकत्र येऊन जमवत.वयस्कर माणसाचा शब्द प्रमाण असायचा.

लग्न जमवणे,दोनाचे चार करणे हे पुण्याचे काम समजले जायचे.लग्न मोडणे पाप समजले जायचे.

आता ना माणसे प्रामाणिक राहिली ना शब्दाला किंमत राहिली.प्रवासा साठी वेगवान साधने आली.अनेक किमी.पर्यंत आता नाते संबंध जोडले जातात.त्यामुळे एकमेका बद्दल जास्त माहिती नसते.लग्न करण्याचे वय वाढले.मूल मुली एकत्र शिकतात.बरोबर राहतात.फोटो काढले जातात.

परंतु मी दुसऱ्या पेक्षा कसा मोठा वेगळा हे दाखवण्याची वृत्ती वाढली.संपत्ती मिळवताना ती कोणत्या मार्गाने येते या पेक्षा पैसा आहे ना ? हे मोठ्या पणाचे लक्षण समजले जाऊ लागले.बरं पैसे भरपूर आले .यातून शत्रू तयार होतात.कोणी प्रमाणिक पणे जरी मोठे झाले तरी त्याचे यश बघवतेच असे नाही.कधी कधी कोणाकडे काही नसते.परंतु मुले हुशार असतात.शिकतात मोठी होतात.

अनेक गोष्टी काही लोकांना मग बघवत नाही.कोणाचे सरळ आणि छान चालू आहे ना मग याना त्रास झाला पाहिजे…अश्या मनसिकते मधून लग्न मोडण्या सारख्या गोष्टी केल्या जातात.समोरच्या लोकांना अगदी काही जाऊन सांगितले जाते.माझ्या माहिती मधील एका मुलीचे लग्न जमले साखरपुडा झाला त्या नंतर त्या मुलीच्या सासरी जाऊन कोणी सांगितले मुलीला कोडे आहे.समोरच्या लोकांनी कोणती शहानिशा न करता लग्न मोडले.त्या नंतर त्या मुलीचे लग्न जमवताना खूप त्रास झाला.मुलगी खूप दिवस डिप्रेशन मध्ये गेली.ज्यांचे लग्न मोडले त्यांना भयंकर त्रास होतो.कधी कधी पुन्हा लग्न जमवणे अवघड होऊन जाते.

खरे तर आपण करतो ते चूक आहे हे माहिती असून फक्त असूया पोटी हे केले जाते.यातून कधी कधी ज्याचे लग्न मोडले त्याचे पुढे जाऊन चांगले होऊन  जाते.तर काहींच्या आयुष्यात कधी भरून न येणारे नुकसान होऊन जाते.

कोणाचे भले करता येत नसेल तर वाईट करू नका.जर वाईट आहे तर नक्की वाईट आहे सांगून कोणाचे भले होत असेल तर अश्या वेळी लग्न मोडण्या सारखे पाप होत असेल तरी ते पाप लागणार नाही.पण खरंच कोणी चांगले आहे तर त्याच्या बद्दल वाईट सांगून पापाचे धनी होऊ नका.कारण कोणाचा तळतळाट घेऊन आपण सुख नाही होऊ शकत.आपल्याच कर्माचा हिशोब येथेच होत असतो म्हणतात.

गैरसमज

गैरसमज
काही लोक खूप रोखठोक असतात.ते गैरसमज करून घेण्या पेक्षा तोंडावर बोलून मोकळे होतात.असे लोक कोणाला आवडत नाही त्याचा राग येतो.पण असेच लोक बरे असतात.उगाच मनात अढी ठेवून वागत नाहीत.मान्य यामुळे माणसे तुटतात पण असेच लोक तुटतात त्यांना त्याची चूक दाखवणे किंवा त्याचे म्हणणे खोडून काढलेले आवडत नाही.

काही लोक गैरसमज कशाचा करून घेतात.अनेकदा समोरच्याची काही गोष्टी मध्ये मजबुरी असते किंवा त्याच्या वागण्या मागे काही रिजन असतात.म्हणून काही गोष्टी मध्ये त्या तसे वागतात.परंतु काही मग त्याना समजून न घेता काही लोक गैरसमज करून घेतात.मनात अढी धरतात.समोरच्याला नक्की काय झाले समजत नाही.अश्या वेळी जरी समजले तरी त्या व्यक्तीने अगदी डोके आपटून त्याच्या वागण्याचे स्पष्टीकरण दिले तरी अनेक दिवस,अनेक वर्षे काही लोक मनात अढी ठेवून वागतात.

काही लोक काही गोष्टीवर गैरसमज तर करून घेतात.पण समोरच्याला त्याच्या वागण्याचे कारण न विचारता मनात बदल्याची भावना ठेवतात.समोरच्याला न कळता छोट्या छोट्या गोष्टीतून बदला घेत राहतात.समोरील व्यक्ती मात्र त्या पासून अनभिन्न असते.कारण तिला वाटत असते माझी काही चूक नाही.समोरच्या व्यक्तीला मी आपले मानले आहे.ती कधी माझ्या बरोबर वाईट वागणार नाही याचा ठाम विश्वास असतो.पण जेव्हा समोरची व्यक्ती छुपे पणे आपल्याशी दुष्मन सारखी वागत होती हे समजल्यावर जगा वरील विश्वास उडून जातो.

अश्या वेळी वाटते जे लोक गैरसमज करून घेतात तो दूर न करता त्यातच जगत राहतात.किती दूर केला तरी स्वताचे तेच खरे हे लावून धरतात तेव्हा त्यांना कोणते स्पष्टीकरण देत बसू नाही.सरळ इग्नोर करावे.
असेच मनातले काही.

Saturday, 8 February 2020

तुम्ही कधी शाळेतून घरी पळून गेले आहेत का?

शाळा खूप आवडायची कारण चौथी पर्यंत आमची मुलींची शाळा होती.आमच्या बाई खूप छान शिकवायच्या.आमच्या वर्गा शेजारी चौथीचा वर्ग होता.त्या वर्गा वरील बाई खूप स्ट्रिक होत्या.सगळे त्यांना घाबरायचे।तेव्हा मी दुसरीला असेल.

तेव्हा शाळेत वर्षातून एकदा दोनदा नक्की आठवत नाही, इंजेक्शन दिले जायचे. दोन तीन नर्स यायच्या .बाईच्या टेबल वर स्टोव्ह ठेवून तो पेटवायच्या  त्यावर एका पातेल्यात गरम पाणी उकळत ठेवायच्या.त्यात सुया टाकायच्या.त्या वर्गात आल्या बरोबर बाई वर्गाचा दरवाज्या आतून बंद करून घ्यायच्या.

त्या काळात चौथी पर्यंत वर्गात खालीच बसण्याची पद्धत होती.नेहमी सारख्या बाई शिकवत होत्या.तेव्हा बाजूच्या वर्गातील बाई बरोबर नर्स येताना दिसली त्या बरोबर मी आणि अजून दोन मुलींनी पाटी पेन्सिल आणि पुस्तकांची पिशवी तिकडेच टाकून जोरात वर्गातून धूम ठोकली.

छोटे गाव जाणार तरी कुठे सरळ घरी.असे अचानक घरी आलेले बघून वडिलांनी विचारले.पाटी पुस्तक कुठे आहेत.तू आता घरी कशी.वडिलांना सांगितले शाळेत सुई मारायला आले आहेत म्हणून मी पळून आली आहे.वडिलांनी सरळ हाताला धरले आणि पुन्हा शाळेत घेऊन गेले.मग काय अर्ध्या गावाला आवाज जाईन एवढी रडारड करून काही फायदा झाला नाही.शेवटी इंजेक्शन घ्यायला लागेलच.बाजूच्या वर्गा वरील बाईंनी त्या नंतर शिक्षा केली ती वेगळीच.

त्यावेळी इंजेक्शनची खूप भीती वाटायची.अगदी लग्न होई पर्यंत.आता तर इंजेक्शन कॉमन झाले.

शाळेत पळून जाण्याची एकच घटना ही.त्या नंतर 12 वीला असताना वर्गात सर शिकवत असताना आम्ही तीन मैत्रिणी सरांना काही कळण्या आधी वर्गातून पळालो होतो.ते पुन्हा कधी.
असेच मनातले काही

Tuesday, 28 January 2020

मैत्री एकटेपणा बरोबर

माणसांनी नेहमी एकटेपणा बरोबर मैत्री करावी.म्हणजे त्याला कशाचे दुःख होत नाही.एकटे असताना माणूस अनेकदा स्वताशीच बोलत असतो.तोच असतो वक्ता आणि तोच असतो श्रोता.तोच असतो परीक्षक आणि तोच असतो परीक्षार्थी.

माणसात किती राहणे आवडली तरी प्रत्येकाला एकांत प्रिय असतो.मग काही वेळा साठी असो नाही तर कायमचा.प्रत्येकाची एकटे राहण्याची कारण वेगवेगळी असतात.म्हणून एकटा राहणार माणूस हा माणूस घाणा असतो असे नाही.

प्रत्येक व्यक्ती ही त्याच्या आजूबाजूला असलेल्या वातावरणा नुसार घडत जाते.जन्मा पासून अनेक गोष्टीचा सामना करत असतो.त्यातून त्याचे रूप समाजाला दिसत असते.पण न दिसणारे एक रूप प्रत्येकाचे असते.ते फक्त आणि फक्त त्या व्यक्तीला स्वतालाच माहिती असते.एकटे असताना ते त्याला आवडते.कोणता नकली मुखवटा धारण न करता तो जसा आहे तसा स्वता समोर येतो म्हणून माणसाला एकांत आवडतो.

मन दुःखी आहे पण चारचौघात रडता येत नाही म्हणून बंद पापण्या आड तो अश्रू लपवतो.पण तोच एकटा असताना ऑक्सबोक्शी रडतो.कोणी मन दुखावले त्याला जाब विचारता येत नाही मग स्वताच स्वताला प्रश्न करत राहतो.त्याचे उत्तर स्वताच शोधतो.

म्हणून एकांत सुद्दा छान मित्रच असतो.
असेच मनातले काही