केबल घराघरात पोहचले नव्हते त्या आधीची पिढी ज्यांनी अनेक चित्रपट हे गणपती किंवा नवरात्र उत्सवात पडदयावर बघितले आहेत.
थिएटर हे फक्त मोठ्या शहरात असत.खेड्यागावा मध्ये एक तर चित्रपट हे कनाती मध्ये किंवा उत्सवातच बघितले जात.मी चार पाच वर्षांची असेन तेव्हा अनेक चित्रपट हे धार्मिक असत.मग संत सखू,संत तुकाराम किंवा ऐतिहासिक असायचे.नेताजी पालकर,थोरतांची कामळा.अश्याच प्रकारचे चित्रपट दाखवले जायचे.ते पण तेव्हा खूप भारी वाटायचे.
आमच्या गावात संत परंपरा मोडून पहिल्यांदा वहिनीच्या बांगड्या, सुशीला ,जगाच्या पाठीवर असे चित्रपट दाखवले गेले.चित्रपट दाखवण्याच्या आधी महिनाभर भोंगा लावून जाहिरात केली जायची.हे चित्रपट बघायला बाजूच्या गावातील लोक बैलगाडी भरून येत.चित्रपट बघताना मात्र त्यावेळची ती साधी माणसे रडायची.विसरून जायचे आपण बघतो ते सगळे खरे नाही म्हणून.
हळूहळू बदल होत गेला गणपती आणि नवरात्री उत्सव साजरे करणारे कार्यकर्ते बदलले.आमच्या गावात मग पहिला हिंदी चित्रपट आला भाई भाई.अमिताभ बच्चन याचा गरम मसाला.फक्त बच्चनचा चित्रपट म्हणून प्रचंड गर्दी झाली होती.शोले गाजलेला चित्रपट मात्र आमच्या गावात कधीच दाखवला गेला नाही.त्याचे बजेट कदाचित जास्त असावे.
गावात थिएटर नव्हते तरी अनेक चित्रपट पडद्यावर बघायला मिळाले आणि ते त्यावेळी एवढे आवडले की आज त्याची आठवण मनात ताजी आहे.राज कपूर याचा चोरी चोरी,श्री 420,बॉबी,प्रेमरोग,हाथी मेरा साथी,जंजिर ,दिवार,डॉन असे अनेक हिंदी चित्रपट बघितले.
गंमत जंमत ,अशी ही बनवाबनवी,आणि अशोक सराफ ,लक्ष्याचे सगळे चित्रपट अश्याच पडद्यावर बघितले आहे.सीमा देव ,जयश्री गडकरी,रंजना ,सुलोचना आम्ही जातो आमच्या गावा मध्ये काम केलेली ,नाव आठवत नाही पण या सगळ्या तेव्हा प्रचंड आवडत होत्या.
मनात खोलवर त्या वयात कायमचा घर करून बसलेला चित्रपट वारणेचा वाघ,आणि सुशील.रंजना यांनी सुशीला मध्ये अफलातून अभिनय केला आहे.एक शिक्षिका ते तिकीट ब्लॅक करणारी पर्यतच प्रवास बघताना मनाला व्यथित करून जातो.
आज असेच अनेक त्यावेळी बघितलेले हे चित्रपट पुन्हा आठवले.हे चित्रपट सहसा पुन्हा टीव्ही वर दिसत नाहीत.काही वर्षांपूर्वी टीव्ही वर ऊन पाऊस नावाचा चित्रपट बघितला होता.नंतर तो इंटरनेटवर खूप शोधला पण नाही मिळाला.
आज असेच पडद्यावर मोफत बघितलेल्या चित्रपटाच्या आठवणी.

No comments :
Post a Comment